बदलापूर : बदलापूर आर्ट गॅलरीतर्फे ऑक्टोबरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यासह हैदराबाद, आसाम, आगरतळा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आदी ठिकाणांहून विविध भागांतील चित्रकारांनी या स्पर्धेत भाग घेतल्याची माहिती आयोजक माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली. या स्पर्धेत क्रीशिता सालियान यांनी रेखाटलेल्या जुन्या मुंबईच्या चित्रकृतीला प्रथम क्रमांकाचे ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
ऑनलाइन स्पर्धेत १५० चित्रकारांचा सहभाग होता. यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन बदलापूर येथील कला दालनात भरविण्यात आले आहे. महिनाभर हे कलादालन विनामूल्य खुले राहणार असल्याचे घोरपडे आणि समितीच्या उपाध्यक्षा भावना सोनवणे यांनी सांगितले. क्रिशिता सालियान यांनी रेखाटलेल्या जुन्या मुंबईच्या चित्रकृतीस ५० हजारांचे पारितोषिक घोरपडे यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे प्रत्येकी दहा हजार रुपयांची पाच पारितोषिके उल्लेखनीय चित्रांना दिली जाणार आहेत. अनिल नाईक, डॉ. जॉन डग्लस, वर्षा खरटमल, श्रीकांत कदम आणि संजय शेलार या नामवंत चित्रकारांनी पाहुणे कलावंत म्हणून या राष्ट्रीय स्तरावरील कला प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती मांडल्या आहेत. क्रिशिता कृष्णा सालियान, विनीता चेंदवणकर, पूजा शेळके म्हात्रे, मोनिका घुले, निहार सुतार आणि योगेश बर्वे यांच्या कलाकृतींना पारितोषिके जाहीर झाली आहेत. ज्येष्ठ चित्रकार अध्यापक अनिल नाईक यांनी या कलादालनाला भेट दिली आहे. प्रथम पुरस्कार प्राप्त क्रिशिता सालियान यांनी काल कलादालनला भेट दिली. बदलापूर येथील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली आहे.
इतर चित्रांचेही प्रदर्शन टप्प्याटप्प्याने२८ नोव्हेंबरला सायंकाळी या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन झाले. सध्या विजेत्या ११ कलाकारांच्या कलाकृती यात पाहता येणार आहेत. महिन्यानंतर स्पर्धेत भाग घेतलेल्यांपैकी निवडक चित्रांचे प्रदर्शन टप्प्याटप्प्याने पुढे कायम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे निवड समितीच्या उपाध्यक्षा भावना सोनवणे यांनी सांगितले.