कल्याण : वाहतुकीसाठी धोकादायक झालेला कल्याणचा जुना पत्रीपूल पाडण्याच्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. हा पूल पूर्णपणे पाडण्यास दीड महिना लागणार आहे.कल्याण रेल्वे मार्गावर असलेला हा पूल ब्रिटिशकालीन होता. पूल धोकादायक होऊनही त्यावरून जड वाहनांची वाहतूक सुरू होती. हा मुद्दा उघड होताच तो वाहतुकीसाठी संपूर्णपणे बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक शेजारील नव्या पत्रीपुलावरून वाहतूक वळवण्यात आली. परिणामी या परिसरात प्रचंड कोंडी होत आहे.जुना पूल पाडून नव्याने पुलाचे बांधकाम करावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वेने जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारपासून पूल पाडण्याचे काम सुरू केले. सध्या पुलावरील डांबरीकरण उखडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पूल पाडण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करावा लागणार आहे. त्याचबरोबर मध्य रेल्वेला पॉवर ब्लॉक घ्यावा लागणार आहे. पुलाखालून रेल्वे मार्ग जात असल्याने ते काम अत्यंत जिकरीचे आहे. कल्याण हे जंक्शन असून, येथे सतत गाड्यांची वाहतूक होते. ती सुरळीत ठेवून पूल पाडण्याचे काम करावे लागणार आहे.नागरिकांचे हाल कायममुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती सुरू असतानाच जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे कल्याण शहरातील वाहतुकीवर प्रचंड ताण आल्याने नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला होता.१० सप्टेंबरपासून मुंब्रा बायपास रस्ता पुन्हा सुरू झाल्याने वाहतुकीचा ताण काही अंशी कमी झाला आहे. मात्र, नवीन पत्रीपूल हा वाहतुकीसाठी अरुंद व अपुरा असल्याने पुलाच्या परिसरात कोंडी होत आहे. कल्याण पूर्वे-पश्चिमेतून ये-जा करणाऱ्या रिक्षांना एक तास लागतो. त्यामुळे नागरिक हैैराण आहेत.
जुना पत्रीपूल दीड महिन्यात पाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 4:10 AM