ठाणे - ठाण्यात झाडे पडण्याची मालिका वर्षाच्या बाराही महिने सुरू असते, त्यातच जोरदार पाऊस सुरू असताना शनिवारी सकाळी ठाणे शहराचे महापौर यांचे शासकीय निवास स्थळ असलेल्या महापौर निवास या बंगल्याच्या आवारातील वडाची दोन झाडे उन्मळून पडली आहेत. हे झाडे बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर कोसळल्याने भिंतीला तडा गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच महापौर नरेश म्हस्के यांनी धाव घेत बंगल्याची पाहणी केली. त्यानंतर महापौर म्हस्के यांनी इतिहासाचा एक साक्षीदार निखळून पडला, अशी भावूक होऊन प्रतिक्रिया दिली.
येऊर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उपवन तलाव परिसरात ठाण्याच्या महापौर यांचे शासकीय निवासस्थळ आहे. निसर्गमय परिसरात हा बंगला असून शनिवारी सकाळी बंगल्याच्या आवारातील मोठे झाडे पडल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला समजताच ठामपा अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. तसेच तात्काळ या घटनेची माहिती महापौर नरेश म्हस्के यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने शासकीय बंगल्यावर धाव घेत पाहणी केली. पडलेल्या झाडामुळे बंगल्याचे काही नुकसान झाले नाही ना? तसेच यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. याची खातरजमा केली. तसेच हे झाडे साधारण ४० ते ४५ वर्ष जुने असून त्या झाडामुळे बाजूला असलेले दुसरे झाड मुळांनिशी उन्मळून पडण्याचा स्थित असल्याची माहिती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
इतिहासाचा एक साक्षीदार निखळून पडला - महापौर
आज अचानक पावसामुळे हा महाकाय वृक्ष उन्मळून पडला. ठाण्यात असे अनेक वृक्ष आहेत, गडकरी रंगायतनच्या आवारात असणारा पिंपळाचा वृक्ष ही काही वर्षांपूर्वी निखळून पडला. गडकरी कट्ट्यावरून मोठ्या झालेल्या अनेक कलावंतांनी त्याबाबत हळहळ व्यक्त केली होती, त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या होत्या म्हणून आम्ही त्याच जागी पुन्हा पिंपळाचा वृक्ष लावून त्याची आठवण जतन केली. तसेच या वृक्षाचे निखळून पडणे मनाला वेदना देणारे, भाव व्याकुळ करणारे आहेत अशी प्रतिक्रिया महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
"महापौर बंगल्याच्या आवारातील झाडे पडल्याचे समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती जाऊन घेत, तात्काळ त्यासंदर्भातील माहिती महापौरांना देण्यात आली. त्यांनी ही बंगल्यावर धाव घेत पाहणी केली. यापुढील कार्यवाही सुरू आहे." संतोष कदम, प्रमुख आपत्ती कक्ष, ठामपा