ठाणे : पुण्यावरून मुंबईत जाण्यासाठी ठाण्यात उतरलेल्या माधव मालिनी बांदेकर या वयोवृद्ध दाम्पत्याची ठाणे रेल्वेस्थानकात राहिलेली बॅग तासाभरात ठाणे रेल्वे प्रशासनामुळे मिळाली. त्या बॅगेत सुमारे २० हजार रुपये आणि कपडे आदी ऐवज होता. राहिलेली बॅग पुन्हा तासाभरात मिळाल्याने बांदेकर या दाम्पत्याने ठाणे रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.माधव बांदेकर हे त्यांची पत्नी मालिनी यांच्यासह पुण्याहून काही दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास आले आहेत. त्यातच गुरुवारी रात्री ते पुण्यावरून एक्स्प्रेसने ठाणे रेल्वेस्थानकात उतरले. त्यानंतर, ठाण्यातून भांडुप येथे जाण्यासाठी ते दोघे ३ आणि ४ नंबर फलाटावर धीमी लोकल पकडण्यासाठी आले होते. याचदरम्यान, लोकलमध्ये चढताना, त्यांच्याकडील एक बॅग फलाटावर राहून गेली. ती कोणीतरी सरकत्या जिन्याखाली असलेल्या मोकळ्या जागेत उचलून ठेवली होती. याचदरम्यान त्या फलाटावर ड्युटीवर असलेला महाराष्टÑ सुरक्षा बोर्डचे निलेश जाधव यांच्या ती निदर्शनास आल्यावर त्यांनी विचारणा करून ती बॅग ताब्यात घेऊन तातडीने ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालय गाठले. त्यानंतर, उपप्रबंधक एस.के. गुप्ता यांच्यासमोर रेल्वे कर्मचारी मनीषा पाटळे आणि नीता निकाळे यांनी बॅगेची तपासणी केली.बॅगची तपासणी केली असता, त्यात कपडे, चप्पल आणि १८ हजार २१५ रुपयांची रक्कम मिळून आली. यामध्ये दोन हजार आणि ५०० रुपयांसह चिल्लरचाही समावेश होता. हा प्रकार गुरुवारी रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला. त्यानंतर तासाभरात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांदेकर दाम्पत्य प्रबंधक कार्यालयात आल्यावर उपप्रबंधक गुप्ता यांनी खातरजमा झाल्यानंतर ती बॅग त्यांच्या स्वाधीन केली.
वयोवृद्ध दाम्पत्यास तासाभरात हरवलेली बॅग मिळाली, ठाणे रेल्वे प्रशासनाची खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 12:35 AM