विशाल हळदे, ठाणे: श्री मावळी मंडळ आयोजित ९८ व्या शिवजयंती उत्सवा निमित्त ७० व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी महिला गटात ज्ञान शक्ती युवा संस्था कल्याण, स्नेहविकास क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, स्फूर्ती सेवा मंडळ ठाणे, माऊली प्रतिष्ठान मुंबई उपनगर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ ठाणे ह्या संघानी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, पुरुष गटात चिंतामणी क्रीडा संघ नवी मुंबई, अमर हिंद मंडळ मुंबई शहर, ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब ठाणे, ओवळी क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, चेंबूर क्रीडा केंद्र मुंबई उपनगर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ डोंबिवली, उजाला क्रीडा मंडळ ठाणे, उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघानी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महिला गटातील सामन्यात कल्याणच्या ज्ञान शक्ती युवा संस्था संघाने मुंबई उपनगरच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाचा ५५-५१ असा ४ गुणांनी पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.सामना सुरुवातीपासून अतिशय चुरशीचा झाला.मध्यन्तराला ज्ञान शक्ती युवा संस्था संघाकडे २१-२० अशी नाममात्र १ गुणांची आघाडी होती.मध्यांतरानंतर ज्ञान शक्ती युवा संस्था संघाच्या यतीक्षा बाबडे हिने अतिशय खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. तिला पक्कडीत सानिया गायकवाड व निधी राजोळे हिने तोलामोलाची साथ दिली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.पराभूत संघकाडून चेतना बटावले हिने एकाकी झुंज दिली.
गटातील दुसऱ्या सामन्यात मुंबई उपनगरच्या स्नेहविकास क्रीडा मंडळाने ठाण्याच्या संकल्प क्रीडा मंडळाचा ४७-३२ असा १५ गणांनी पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.सामन्याच्या मध्यंतराला स्नेहविकास क्रीडा मंडळाने २३-११ अशी १२ गुणांची आघाडी घेतली ती मेघना खेडकर च्या उत्कुष्ट चढायांमुळे. उत्तरार्धात स्नेहविकास क्रीडा मंडळाने आपला आक्रमक खेळ तसाच पुढे चालू ठेवून सामना १५ गुणांनी जिंकला.
पुरुष गटातील पहिल्या सामन्यात ठाण्याच्या ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाने अतिशय चुरशीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या संघर्ष क्रीडा मंडळाचा३०-२९ असा १ गुणांनी पराभव केला.ओम वर्तक नगर स्पोर्ट्स क्लब संघाकडे मध्यंतराला १८-०६ अशी १२ गुणांची आघाडी होती ती जयेश यादवच्या खोलवर चढाया व त्याला पक्कडीत ओंकार फोफळणकरने दिलेल्या सुंदर साथीमुळे. मध्यंतरानंतर संघर्ष क्रीडा मंडळाकडून परशुराम पाटील व सुजित चव्हाण यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु ते आपल्या संघाला पराभव टाळू शकले नाहीत.दुसऱ्या सामन्यात मुंबई शहरच्या अमर हिंद मंडळाने नवी मुंबईच्या ग्रिफिन जिमखाना संघावर ३२-२८ असा ४ गुणांनी विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला तो जयेश यादवच्या सुंदर अष्टपैलू खेळामुळे. मध्यंतराला अमर हिंद मंडळाकडे २१-१४ अशी ७ गुणांची आघाडी शेवटपर्यंत राखण्यात अमर हिंद मंडळाला यश मिळाले. पराभूत संघाकडून सुरज दुधळे याने उत्तम खेळ केला.
- १९/०४/२०२३ दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला) : यतीक्षा बाबडे (ज्ञान शक्ती युवा संस्था, कल्याण ठाणे)
- १९/०४/२०२३ दिवसाची उत्कुष्ट पक्कड (महिला) : नयना झा (माऊली प्रतिष्ठान, मुंबई उपनगर)
- १९/०४/२०२३ दिवसाचा उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : जयेश यादव (अमर हिंद मंडळ, मुंबई शहर)
- १९/०४/२०२३ दिवसाची उत्कुष्ट पक्कड (पुरुष) : विजय चव्हाण (छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ, डोंबिवली)