उल्हासनगर : महापालिकेची सत्ता एकहाती घेण्यासाठी ओमी कलानी आणि त्यांच्या टीमला पक्षात थेट प्रवेश दिला, तर पॅकेजसह त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील; तसेच राजकारणाच्या गुन्हेगारीला पाठबळ दिल्याचा ठपका येऊ नये म्हणून त्यांना मागच्या दाराने प्रवेशाचा विचार पक्षात सुरू आहे. त्यांच्या गटाशी वेगळी युती करायची किंवा त्यांना स्वतंत्र लढायला सांगून नंतर सत्तेसाठी एकत्र यायचे असा हा प्रस्ताव असल्याचे सांगितले जाते. तसे झाल्यास ओमी यांच्या मागण्या आताच्या घडीला मान्य कराव्या लागणार नाहीत. त्यामुळे भाजपाच्या ठाण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत शुक्रवारी संध्याकाळी ओमी यांचा थेट प्रवेश होण्याबाबत वेगवेगळी मते गुरूवारी व्यक्त होत होती. त्यातच शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ओमी टीमसाठीची नकारघंटा कायम ठेवली, तर दुसऱ्या गटाने ओमी यांच्या बाजुने आपला पाठिंबा जाहीर केला. या घोळामुळे ओमी यांनी ‘भाजपा प्रवेशापेक्षा शहरहिताला प्राधान्य देणार’ अशी प्रतिक्रिया दिली.उल्हासनगरचे राजकारण भाजपा व ओमी यांच्या प्रवेशाभोवती सध्या फिरत आहे. प्रवेशाचे गळ टाकणाऱ्या भाजपाकडे ओमी यांनी पॅकेजची अट घातली की अन्य कोणत्या मागण्यांची, असा मुद्दा शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात होता. ओमी टीमला प्रवेश दिल्यास भाजपाला पालिकेत एकहाती सत्ता मिळणार असूनही पक्ष प्रवेशाबाबत खळखळ करत असल्याने ओमी यांच्या ‘अवघड’ अटींबाबत चर्चा सुरू आहे. भाजपाचा एक गट अद्यापही ओमी यांच्या प्रवेशाच्या बाजुने असल्याने तो फुटू नये, यासाठी पक्षात बऱ्याच घडामोडी सुरू आहेत, तर माजी आमदार कुमार आयलानी यांचे राजकीय भविष्य या प्रवेशामुळे पणाला लागणार आहे. ओमी यांचा भाजपात प्रवेश झाला नाही, तर भाजपाची थेट लढत त्यांच्या उमेदवारांसोबत होईल आणि पक्षाचे अधिक नुकसान होईल. त्यामुळे त्यांच्यासोबत युती करण्याचा किंवा त्यांना प्रवेश न देता सोबत घेण्याच्या पर्यायावरही चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांची भिस्त सिंधी समाजावर आहे. त्या मतांत फाटाफूट होऊ नये, यासाठीही तोडग्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधी समाजावर कालानी कुटुंबाची जादू कायम असून मराठी व आंबेडकरी समाजात त्यांची क्रेझ कायम आहे. (प्रतिनिधी)
ओमी कलानी मागच्या दाराने?
By admin | Published: January 12, 2017 6:57 AM