सदानंद नाईक उल्हासनगर : महापौर निवडणुकीत पक्षाचा व्हिप डावलणाऱ्या ओमी टीम समर्थक नऊ नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांनी नोटिसा दिल्यानंतर भाजप आणि ओमी टीम आमने-सामने उभे ठाकले आहेत. ओमी समर्थक नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर शहरातून कलानीराज संपुष्टात येईल, असा दावा भाजपचे शहराध्यक्ष जमनू पुरस्वानी यांनी या पार्श्वभूमीवर केला आहे.
उल्हासनगर महापालिकेत भाजपचे बहुमत असताना महापौरपदी शिवसेनेच्या लीलाबाई अशान निवडून आल्या. भाजपमधील ओमी समर्थक नऊ नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप डावलून मतदान केल्याने, त्यांच्याविरोधात पक्षाचे गटनेते जमनू पुरस्वानी यांनी कोकण विभागीय आयुक्ताकडे धाव घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची याचिका दाखल केली. दरम्यान, जमनू पुरस्वानी यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्यावर त्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा केला. त्यानंतर, विभागीय आयुक्तांनी नऊ नगरसेवकांना नोटिसा पाठवून २४ जानेवारी रोजी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले. व्हिप डावलणाºया नऊ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा दावा पुरस्वानी यांनी पत्रकार परिषदेत केला.
नोटिसा मिळाल्याने कलानी समर्थक नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली. नगरसेवकांना शांत राहण्याचे आवाहन करून एकाचेही पद जाणार नसल्याचे ओमी कलानी यांनी यावेळी ठणकावून सांगितले. ओमी टीमचे प्रवक्ते कमलेश निकम म्हणाले की, आमच्या नगरसेवकांची चिंता भाजपने करण्याची गरज नाही. मात्र, ज्या वॉर्डातून पुरस्वानी निवडून आले आहेत, तेथून ते पुन्हा निवडून येणार नसल्याचा दावा त्यांनी केला. कमलेश निकम आणि जमनू पुरस्वानी हे एकमेकांसमोर उभे ठाकले असून, दोघांतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.भाजप विरुद्ध कलानी वाद रंगण्याची चिन्हेउल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून कुमार आयलानी निवडून आल्यावर त्यांचा सर्वसामान्य नागरिकांसोबत असलेला संवाद तुटल्याचा आरोप होत आहे. त्यापाठोपाठ पालिका हातून गेल्याने भाजपकडे असलेला कार्यकर्त्यांचा ओघ कमी होत गेल्याचे बोलले जात आहे. एकूणच नजीकच्या काळात भाजपविरुद्ध कलानी असा वाद रंगण्याची शक्यता आहे.