उल्हासनगर : जूनमध्ये महापौरपद मिळेल, या आमिषापोटी ओमी कलानी यांनी प्रभाग समितीच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने स्थायी व प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुका बुधवारी बिनविरोध झाल्या. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या जया माखिजा निवडून आल्या. भाजपा, साई पक्षासोबत आमची टीमही सत्तेत सहभागी असल्याने आम्हाला सत्तेत ३३ टक्के वाटा हवा असा आग्रह धरणाऱ्या ओमी यांनी माघार घेतल्याने त्यांची पदांची पाटी सध्या कोरी राहिली आहे.स्थायी व प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी भाजपा-ओमी टीम व साई पक्षातील नगरसेवकांत स्पर्धा होती. स्थायी सभापतीपदासाठी भाजपाच्या जया माखिजा यांचा एकमेव अर्ज आल्याने, त्यांची सभापतीपदाच्या निवडीची घोषणा शिल्लक होती. प्रभाग तीन आणि चारच्या सभापतीपदासाठी अनुक्रमे साई पक्षाच्या ज्योती चैनानी व शिवसेनेच्या ज्योती माने यांचेच अर्ज आल्याने, त्यांचीही सभापतीपदाची घोषणा शिल्लक होती. प्रभाग एक आणि दोनच्या सभापतीपदासाठी भाजपा, ओमी कलानी व साई पक्ष आमनेसामने उभे ठाकल्याने सर्वांचे लक्ष या निवडीकडे होते.पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रभाग समिती एकच्या सभापतीपदी भाजपचे सोनू छापू तर प्रभाग दोनच्या सभापतीपदी साई पक्षाचे अजित गुप्ता यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. दोन्ही ठिकाणी ओमी टिमच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने ही निवड बिनविरोध झाली. त्यामुले आता सारे लक्ष जूनमधील महापौरपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे.>सभापतीपदांपासून वंचितपालिकेच्या सत्तेत ३३ टक्के वाटा मागणाºया ओमी टीमने प्रभाग समितीच्या दोन सभापतीपदांवर दावा केला होता. पण या टीमला महापौरपदाचे आमिष दाखवून स्थायी समिती सभापतीपदासह प्रभाग समितीच्या सभापतीपदापासून वंचित रहावे लागले. साई पक्षाला दोन सभापतीपदे मिळाल्याने त्यांना लॉटरी लागली.
महापौरपदाच्या लालसेने ओमी कलानींची पाटी कोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 3:16 AM