ओमी कलानी यांचा पंटर पंकज त्रिलोकानी गँगस्टर सुरेश पुजारी याचा खबरी असल्याचा आरोप करून गृहविभागाकडे चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, तर भाजप नेत्याबाबत योग्य वेळी बोलू, असा इशारा ओमी कलानी यांनी दिला आहे. त्यामुळे उल्हासनगरमध्ये आता भाजप आणि कलानी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
गुरुवारी झालेल्या या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रदीप रामचंदानी उपस्थित हाेते. पोलिसांनी अटक केलेला गँगस्टर सुरेश पुजारी याने ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक पंकज त्रिलोकानी यांचे खबरी म्हणून नाव घेतले आहे. त्रिलोकानी यांच्यासह अन्य तीनजण कोण? असा प्रश्न शहराध्यक्ष पुरस्वानी यांनी केला. शहरात गुन्हेगारीची पार्श्वभूमी ही कलानी कुटुंबापासून सुरू होते, असेही ते म्हणाले. त्रिलोकानी यांच्यासह अन्य जणांची तपास करण्याची मागणी गृहविभागाकडे करणार असल्याची माहिती यावेळी आमदार आयलानी यांनी दिली.
राष्ट्रवादीचे नेते ओमी कलानी यांनी त्रिलोकानी हे व्यापारी आहेत. ओमी कलानी टीमचे ते सक्रिय पदाधिकारी होते, तर आता ते राष्ट्रवादीत काम करीत असल्याचे सांगितले. शहरात भाजप विशिष्ट भागापुरती शिल्लक असून, येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपला दुहेरीही संख्या गाठू देणार नाही, असे ते म्हणाले. भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्याविषयी वेळ येईल तेव्हा बाेलू, तर आमदार आयलानी हे गँगस्टर पुजारी याचे नाव घेतानाही पुजारीजी म्हणतात यावरून आपले आमदार कसे आहेत, याचा नागरिकांनी विचार करावा, अशी टीका कलानी यांनी केली.