उल्हासनगर : गुन्हेगारी आरोप असलेल्यांना पक्षात प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावरून टीका होऊ नये, म्हणून ओमी कलानी यांच्या टीमशी आघाडी केल्याचा देखावा करणाऱ्या भाजपाने उमेदवारी अर्ज भरताना मात्र त्यांच्यासह सर्व सदस्यांना कमळ चिन्हासह एबी फॉर्म दिल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्यामुळे आजवर त्यांचे वेगळे अस्तित्व ठेवल्याची घोषणा करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी मौन बाळगले आहे, तर खुद्द ओमी यांनी आढेवेढे घेत कमळाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले.ओमी यांचा गट स्वतंत्र ठेवला, तर पुढील काळात साई पक्षाप्रमाणेच तो गट भाजपाला सत्तेसाठी सतत खेळवत राहील. त्यामुळे त्यांना भाजपात थेट प्रवेश देऊन ही संदिग्धता संपवण्याची भूमिका वरिष्ठ नेत्यांनी घेतली. त्यासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तंबी देत कमळ चिन्हाचा आग्रह धरल्याचे सांगण्यात येते. ओमी यांच्या पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्यांची समजूत काढण्यासाठी उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांना स्वतंत्र आघाडीचा दर्जा देणाऱ्या भाजपाच्या नेत्यांनी अखेरच्या क्षणी ओमी यांना पक्षात घेत त्यांना आपले चिन्ह बहाल केले आणि भाजपातील त्यांच्या विरोधकांचाही विरोध मोडून काढला. त्यामुळे भाजपाची लढत थेट शिवसेना आणि त्यांच्यासोबतच्या पक्षांशी होणार आहे. भाजपा हा गुंडांचा पक्ष आहे, अशी सडकून टीका करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या पक्षाला लक्ष्य केले होते. ज्या कलानी कुटुंबाविरोधात रान उठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याविरोधात भाजपाने एकेकाळी राळ उठवली होती, त्याच पप्पू कलानी यांच्या मुलाला पक्षात प्रवेश दिल्याने पक्ष अडचणीत येऊ शकतो हे गृहीत धरून आधी त्यांच्याशी आघाडी केल्याचे भाजपा नेत्यांनी भासविले आणि नंतर अधिकृत चिन्ह देत त्यांना पक्षात प्रवेश दिला. (प्रतिनिधी)
ओमी कलानी गुपचूप भाजपात!
By admin | Published: February 03, 2017 3:25 AM