उल्हासनगर : तुतारी व ट्रम्पेट या चिन्हावरून मतदारांत संभ्रम निर्माण होऊन मताचे विभाजन टाळण्यासाठी ओमी कलानी यांनी मित्र मनोज लासी यांना नागरी विकास पार्टी पक्षांकडून ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविल्याचे बोलले जाते. लासी हे कट्टर कलानी समर्थक असून ओमी कलानी यांच्या सोबत तुतारी चिन्हाचा प्रचार करीत आहेत.
उल्हासनगर मतदारसंघातून कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक मनोज लासी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर कलानी समर्थकासह मित्र पक्ष व विरोधी पक्ष नेत्यांना आश्चर्य वाटले होते. ओमी कलानी हे शरद पवार गटाडून तुतारीवाला माणूस या चिन्हावर निवडणूक रिंगणात आहेत. तर मनोज लासी यांनी नागरी विकास पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल करून चिन्ह वाटप वेळी त्यांनी ट्रम्पेट चिन्हे घेतले. लोकसभा निवडणुकीत तुतारीवाला माणूस व ट्रम्पेट चिन्हाबाबत मतदारांत संभ्रम निर्माण होऊन तुतारी चिन्हे समजून मतदारांनी ट्रम्पेट चिन्हावर मतदान केल्याचे उघड झाले. पक्ष प्रमुख शरद पवार यांनी यावर निवडणूक आयोगात आशेप घेतला होता.
पप्पू कलानी कुटुंबाचे कट्टर समर्थक असलेले मनोज लासी हे नागरी विकास पक्षाच्या ट्रम्पेट चिन्हावर निवडणूक रिंगणात असताना, प्रचार स्वतः ऐवजी मित्र ओमी कलानी यांच्या तुतारीवाला माणूस या चिन्हाचा करीत आहेत. कलानी कुटुंबानी मनोज लासी यांना दोन वेळा महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदी निवडून दिले. तसेच कलानी यांचे निवडणुकीत मुख्य प्रचारक आहेत. ओमी कलानी निवडून येण्यासाठी शहरांत विविध संकल्पना राबवून पप्पू कलानी यांच्या सोबत सावली सारखे लासी फ़िरत आहेत. कलानी यांच्या चलाखीमुळे ट्रेम्पेट चिन्हे निवडणूकीत नावाला असणार असून प्रचार फक्त तुतारीचा करून मत विभाजन टाळण्याचा प्रयत्न कलानीकडून केला जात आहे.