सदानंद नाईकउल्हासनगर : वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी शहाड फाटक येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी ओमी टीमने जय्यत तयारी केली असून जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक लावले असून त्यावर महापौर मीना आयलानी, भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांचे फोटो नसल्याने कलानी-आयलानी वाद चव्हाट्यावर आला आहे. दरम्यन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आयलानी यांनीही स्वागताची कंबर कसून तयारी केली आहे.उल्हासनगर महापालिकेवर भाजपाच्या सत्ता स्थापनेत महत्वपूर्ण भूमिका वठवणाऱ्या ओमी टीमला भाजपाने खड्डयासारखे बाजूला टाकल्यामुळे ओमी टीममध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मुख्यमंत्र्यांंच्या आश्वासनानंतरही ओमी टीमच्या महापौरपदावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. महापौरपदाच्या पहिल्या टर्मपैकी सव्वा वर्ष महापौरपद ओमी टीमला देण्याचे ठरले होते. त्यानुसार मीना आयलानी यांचा सव्वावर्षाचा कार्यकाळ पाच जुलैला संपत असून पुढील सव्वावर्ष ओमी टीमच्या महापौरांना मिळणार आहे. मात्र आयलानी महापौरपदाचा राजीनामा देत नसल्याने ओमी टीमच्या महापौरपदावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. ओमी कलानी टीमला महापौरपद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, अशी भीती भाजपाच्या वरिष्ठ व स्थानिक नेत्यांनी व्यक्त केली आहे.रविवारी वरपगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री येत आहेत. वरपला जाण्यासाठी उल्हासनगर- शहाडमार्गे मुरबाड रस्त्याने जावे लागते. शहरात प्रवेश करताना शहरजिल्हा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या जंगी स्वागताची तयारी कुमार आयलानी, महापौर आयलानी यांच्यासह इतर सहकाºयांनी केली आहे. तर दुसरीकडे ओमी टीमही मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शहराच्या विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची पोस्टर लावली आहेत.पोस्टरमधून महापौर व शहराध्यक्षांचे फोटो गायब असून सभागृहनेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा व राम चार्ली यांचे फोटो लावण्यात आले आहेत. कलानी-आयलानी परस्पर उभे ठाकल्याने शहरातील राजकारण चांगलेच तापले असून मुख्यमंत्र्यांना याची दखल घ्यावी लागणार असे बोलले जात आहे.
ओमी दाखवणार ताकद, मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:11 AM