- सदानंद नाईक
उल्हासनगर : आमदार ज्योती कलानी यांच्या नेतृत्वाखाली झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार परिवर्तन मेळावा यशस्वी होण्यासाठी भाजपामध्ये गेलेल्या ओमी टीमचे कार्यकर्ते धावून आल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्याणमधील भाजपाच्या कार्यक्रमात आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गर्दी जमवणारी ओमी टीमचीच मंडळी होती.
उल्हासनगरातील मयूर लॉन्स पटांगणात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते छगन भुजबळ, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गणेश नाईक, शशिकांत शिंदे, चित्रा वाघ, डॉ. फौजिया खान, संजीव नाईक, प्रमोद हिंदुराव, गुलाब करंजुले, सदा पाटील, भरत गंगोत्री, प्रवीण खरात आदी नेते हजर होते. मात्र, या मेळाव्याच्या गर्दीत सर्वाधिक कार्यकर्ते ओमी टीमचे होते. ओमी कलानी व महापौर पंचम कलानी हे भाजपामध्ये असल्याने प्रत्यक्ष मेळाव्याला उपस्थित नसले, तरी आईच्या म्हणजे ज्योती कलानी यांच्या नेतृत्वाखालील मेळावा यशस्वी होण्यासाठी ओमी यांनी आपली टीम कामाला जुंपून गर्दी खेचून आणली, हे स्पष्ट आहे.
राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन मेळाव्याला उपस्थित असलेली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्याण येथील सभेला हजर असलेली गर्दी ही एकच असल्याचे बोलले जात आहे. ओमी कलानी टीमच्या प्रत्येक कार्यक्रमाला व मेळाव्याला दिसणारे चेहरे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जमले होते. त्यामुळे उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा या पक्षांचा ‘जनाधार’ एकच असल्याची खुसखुशीत चर्चा रंगली आहे. भाजपा, राष्ट्रवादी व ओमी टीमच्या मेळाव्यात दिसणारे कार्यकर्ते निवडणूक काळात तीन शिफ्टमध्ये काम करणार कीकाय, असा प्रश्न विचारला जात आहे. आ. ज्योती कलानी यांनी मेळावा यशस्वी करून दाखवल्याबद्दल राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्यावर मेळाव्यात स्तुतिसुमने उधळली. ज्योती कलानी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याची औपचारिकता केवळ बाकी आहे. मात्र, ज्योती यांच्या विजयाकरिता भाजपाच्या वळचणीला असलेली ओमी टीम राबणार का, अशी चर्चा आहे.शहर राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावरमहापालिका पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याऐवजी भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या शहराध्यक्ष व आ. ज्योती कलानी यांची हकालपट्टी करण्याची मागणी पक्षाचे गटनेते व नगरसेवक भरत गंगोत्री यांनी वरिष्ठांकडे केली होती.पक्षाच्या नेत्यांनी गंगोत्रीच्या मागणीकडे दुर्लक्ष करत, ज्योती कलानी यांच्याकडे पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे देऊन विश्वास दाखवला. रविवारच्या मेळाव्यात भरत गंगोत्री स्वत: मोजक्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. तसेच गंगोत्री यांनी शहरभर लावलेल्या मेळाव्याच्या पोस्टर्सवर ज्योती कलानी यांचा फोटो नसल्याने पक्षातील वाद धुमसत असल्याचेच संकेत प्राप्त झाले.