उल्हासनगर - भाजपातील असंतुष्ट आणि साई पक्षाने गेल्या महिन्यात दबाव आणून पालिकेतील सत्तेला धक्का देत ओमी कलानींची कोंडी करण्याचा प्रयत्न करूनही शांत असलेल्या त्या गटाने दबावतंत्र सुरू केले आहे.महापालिकेच्या सत्त्तेत सर्वाधिक नगरसेवक असलेल्या ओमी टीमने स्थायी समितीच्या सभापतीपदासह महापौरपदावर दावा सांगितला आहे. एका वर्षाच्या सत्ताकाळात टीमला एकही मोठे पद मिळाले नसून सत्तेतील कराराप्रमाणे भाजपाने दोन्ही पदे द्यावी, अशी प्रतिक्रिया ओमी कलानी यांनी व्यक्त केली. एप्रिलमध्ये या पदांची मुदत संपत आहे. ती देण्यावरून भाजपाने खळखळ केली, तर पुढील महिना-दीड महिन्यात भाजपात बºयाच नाट्यपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यता आहे.ओमी गटाला ही पदे देण्यास भाजपातील एका गटाचा ठाम विरोध आहे आणि त्यांना साई पक्षाची साथ असल्याने तो गट काय भूमिका घेतो, यावर बरेच अवलंबून आहे. शिवसेनेने मात्र या राजकारणात शांतपणे खेळी करत नेहमीच ओमी टीमला बळ पुरवल्याने आता जर ओमी टीमला पदे नाकारली, तर शिवसेनेला राजकीय कुरघोडी करण्यास आयती संधी मिळण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षी झालेल्या उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपाने ओमी टीमसोबत आघाडी केली. त्यांच्या समर्थकांना भाजपाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. या आघाडीमुळे भाजपाचे तब्बल ३२ नगरसेवक निवडून आले. त्यात सर्वाधिक भरणा ओमी टीमच्या नगरसेवकांचा आहे. पुढे सत्तेसाठी संख्याबळाचा आकडा गाठताना भाजपाने साई पक्षासोबत घरोबा केला. महापौरपद भाजपाच्या मूळ गटाकडे ठेवून उपमहापौर व स्थायी समिती सभापतीपद साई पक्षाला देण्यात आले. एका वर्षानंतर स्थायी समितीचे सभापतीपद व सव्वा वर्षानंतर महापौरपद ओमी टीमला देण्याचे आश्वासन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले. पद देण्याचा काळ जवळ येत चालल्याने भाजपा आघाडी धर्माचे पालन करेल, असा विश्वास व्यक्त करत ओमी कलानी यांनी अप्रत्यक्षरित्या नेत्यांवर दबाव आणण्यास सुरूवात केली आहे.ओमी टीमला पद देण्याचा काळ जवळ येताच साई पक्षाने शहर विकासाचा प्रश्न भाजपा श्रेष्ठीकडे लावून धरत ३१ मार्चनंतर पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला. सत्ताच अडचणीत आल्याने भाजपाने साई पक्षाची मनधरणी करत मंत्रालयात बैठका घेत साई पक्षाच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. मार्चअखेर स्थायी समिती सभापती कंचन लुंड यांचा कार्यकाळ संपत आहे. ते पद ओमी टीमकडे जाणार असल्याचे ठाऊक असूनही भाजपाच्या एका गटाने या पदासाठी जोर लावला आहे. सहजासहजी हे पद न मिळाल्यास ओमी टीम स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत असल्याचे मानले जाते. त्या स्थितीत त्यांना शिवसेनेने पाठबळ दिल्यास असंतुष्टांचे राजकारण भाजपाच्या अंगलट येऊ शकते.नगरसेवकांवर भाजपाने केला दावानिवडणूकपूर्व आघाडीत ओमी कलानी यांनी भाजपावर विश्वास ठेवून आपल्या समर्थकांना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरविले. त्यामुळे भाजपाच्या चिन्हावर तब्बल ३२ नगरसेवक निवडून आले.त्यापैकी अर्धेअधिक ओमी टीमचे आहेत. पण त्यांना ओमी कलानी यांचा नव्हे, तर भाजपचा व्हिप लागू पडतो, असा इशारा भाजपाच्या नेत्यांनी देण्यास सुरूवात केली आहे.त्यामुळे ओमी टीमचा वापर करून सत्तेतील पदे उपभोगायची, पण त्या टीमला लाभ द्यायचा नाही, या वृत्तीतून त्या टीमने बंड केले, तर भाजपाला हातातील सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा भाजपाच्या अन्य नेत्यांनी दिला आहे.ओमी टीमची नाराजी दूर केली नाही, तर पुढे भाजपाच्या शब्दावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आश्वासन पाळा, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
ओमी टीमने केली भाजपाची कोंडी, महापौरपद, स्थायीवर दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:56 AM