भिवंडी- भिवंडी शहरातील विस्डम अकादमी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यांसह पालकांचे वर्तन चांगले नसल्याने सहा विद्यार्थ्यांना शाळेतून काढथ त्यंचा दाखला पोस्टाने पाठवल्यानंतर, पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. विशेष म्हणजे यातील तीन विद्यार्थ्यांनी शिक्षण हक्क अधिनियमाद्वारे ऑनलाइनपद्धतीने प्रवेश घेतला होता. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये प्रचंड अक्रोश पसरला आहे. यानंतर, कॉम्रेड विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षा सुधार समितीच्या वतीने पालिका प्रशासन या बाबत कोणतीही कारवाई खाजगी शाळांवर करीत नसल्याने गुरुवारी पालिका मुख्यालयासमोर मेरी पाठशाळा अभिनव आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन ५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून अनेक विद्यार्थी रस्त्यावर अभ्यासाचे धडे गिरवीत बसले आहेत.
भिवंडीतील गुलजारनगर येथे विस्डम अकादमी इंग्लिश स्कूल असून या खाजगी शाळेत सुमारे ८५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील तीन वर्षांपासून शाळेने वाढीव फी आकाऱल्याने पालकां सोबत वाद सुरू झाला होता. हा वाद वाढत गेल्याने काही पालकांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद शिक्षण विभाग व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे शाळेच्या फी वाढी संदर्भात तक्रार केली होती. त्या रागातून चौकशी सुरू झाल्याने त्याचा राग मनात ठेवून शाळा व्यवस्थापनाने बिलाल रेहान अन्सारी इयत्ता ५ वी, उबेदरजा रेहान अन्सारी इयत्ता ३ री, मोमीन मोहम्मद सजल इयत्ता ५ वी, मोहम्मद हासीब मोमीन इयत्ता ५ वी, सलमानी अब्दुल रेहमान मोहम्मद अफाक इयत्ता ४ थी,अन्सारी मोहम्मद अयान इयत्ता ३ री अशा विद्यार्थ्यांवर ही कारवाई शाळा प्रशासनाने केली आहे.त्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे वर्तन चांगले नसल्याचे,शाळेतील शिक्षक,कर्मचारी यांना अपमानास्पद वागणूक देत असून,फी मागितली असता पालक कर्मचाऱ्यांना शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी देतात.अशी कारणे या विद्यार्थ्यांना शाळेतून काढताना देण्यात आली आहेत.
विद्यार्थी हे प्राथमिक शाळेत शिकत असून बालवयात त्यांच्या कडून गौरवर्तन कसे घडू शकते असा सवाल उपस्थित करीत शाळा व्यवस्थापनाने वाढविलेल्या फी संदर्भात शासना यंत्रणे कडे तक्रार केल्याच्या रागातून आमच्या मुलांवर शाळेतून काढून टाकण्याची कारवाई केली असून आमच्या मुलांच्या शैक्षणिक आयुष्याचे नुकसान शाळा व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप पालक रेहान अन्सारी यांनी केला आहे.शिक्षणाचा अधिकार हा सर्वांसाठी असताना शहरातील काही खाजगी शाळा मनमानी करीत आहेत, त्याविरोधात कारवाई करण्या बाबत शिक्षण विभागा कडून पालिकेस निर्देश दिले असतानाही पालिका प्रशासन खाजगी शाळा व्यवस्थापनास पाठीशी घालत कारवाई करीत नाही अशी प्रतिक्रिया कॉ. विजय कांबळे यांनी दिली आहे .