नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे या मार्गाचे अत्यंत दुर्दशा झाली आहे. दुरावस्था झालेल्या रस्त्यावर त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने त्याचा त्रास सर्वसामान्य वाहनचालक, प्रवासी,चाकरमानी विद्यार्थी यांना सोसावा लागत आहे.मागील दोन महिन्यांपासून या महामार्गावरील प्रवास यातनामय झालेला असताना मुंबई नाशिक या अवघ्या अडीच तासाच्या प्रवासाकरिता सात ते आठ तास लागत असल्याने नागरिक व प्रवाशांची अडचण लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांसोबत या महामार्गाची पाहणी करत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक स्वतः पाहिले. या पाहणी दौऱ्यात आमदार शांताराम मोरे,शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक विभाग यांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते.
या महामार्गावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून यावर उपाय म्हणून अवजड वाहने वाहतूक कोंडी होईल अशा वेळेस पार्किंग झोन मध्ये थांबवून वाहतूक सुरळीत झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्याची मुभा देण्याचा निर्णय झाला आहे. कल्याण तलवली फाटा व खडवली नाका या ठिकाणी उड्डाणपूल बनवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या असल्याचे सांगत या महामार्गावरील खड्डे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भरले जाणार असल्याने हे खड्डे भरल्या नंतर अवघ्या दोन तासांनी त्या मार्गावरून जाणारी वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्या पूर्वी खड्डे बुजविण्याचे प्रयत्न - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली.मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी येण्याच्या काही तास आधी पडघा टोल व्यवस्थापन व रस्ते विकास महामंडळ व बांधकाम प्रशासनाकडून तातडीने खड्ड्यांवर थातुर मातुर मलमपट्टी करण्यास सुरवात केली होती.या घाईघाईच्या खड्डे भराईच्या कामाचा स्थानिक नागरिकांनी प्रशासन टोल व्यवस्थापन कंपनी विरोधात संताप व्यक्त केला आहे.