- सदानंद नाईकउल्हासनगर - बीएसपीच्या शिष्टमंडळाने आयुक्त माननीय अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची भेट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोबाईल व्हॅन स्क्रीनद्वारे त्यांचा जीवनपट व इतिहास दाखविण्याची मागणी केली. तसेच बाबासाहेबांच्या एनहीलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाच्या प्रती शहरात वाटण्याचे सुचविले.
उल्हासनगरात आंबेडकरवाद्यांची संख्या मोठी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरात विविध उपक्रम राबविले जातात. डॉ आंबेडकर ते बौद्ध जयंती दरम्यान एक महिनाच्या कालावधीत विविध उपक्रम सुरू असतात. शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हा संघटक नाना बागुल, माजी नगरसेवक शांताराम निकम, नाना पवार, प्रमोद टाले यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त अजीज शेख यांची भेट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक मार्ग, रॅली मार्ग ठिकाणीं पिण्याचे पाणी, नाष्टा आदींची उपाययोजना करण्याची मागणी केली. आयुक्तांनी नेहमीप्रमाणे चोख उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर बीएसपीचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांच्यासह शिष्टमंडळाने भेट घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास जनमानसात माहिती होण्यासाठी मोबाईल व्हॅन स्क्रीनद्वारे त्यांची गाजलेली भाषण व बाबासाहेबांचा संघर्ष तसेच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट हे जनसामान्य व तरुणांपर्यंत पोहोचतील. असे दाखवावे. अशी मागणी पक्षाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी केली. आयुक्तांनी आदी मागण्याचा विचार केला जाईल. असे आश्वासन त्यांनी दिली आहे. बहुजन समाज पक्षाच्या शिष्टमंडळा मध्ये प्रशांत इंगळे, जिल्ह्याचे सचिव रमेश धनवे, विधानसभेचे अध्यक्ष दीपक जाधव यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.