उल्हासनगर : महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सलग १८ तास अभ्यासाचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला. यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी सलग १८ तासांचा संकल्प पार पाडला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत मार्गदर्शन करण्यात आले.
उल्हासनगर महापालिकेने गोरगरीब व गरजू मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेत पास होऊन प्रशासकीय सेवेत येण्यासाठी कॅम्प नं-३ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका बांधली आहे. अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे पुस्तके महापालिकेने उपलब्ध करून देण्यात आलें असून मुलांच्या सुविधेसाठी इतर सुखसुविधा पुरविण्यात आले. या अभ्यासिकेतून देशमुख नावाचा अंगणवाडी सेविकेच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत यश मिळविले असून अनेक जण प्रशासकीय सेवेत दाखल झाले. अभ्यासिकेचा जास्तीत जास्त मुलाने लाभ घेण्यासाठी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम १४ एप्रिल रोजी राबविण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त दिपक जाधव यांनी मुलांना मार्गदर्शन केले आहे.
थोर समाजसुधारकांना अभिवादन करण्यासाठी व त्यांनी दिलेल्या शिकवणुकीतून व राष्ट्रपुरुषांना जातीपातीत विभागून डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घेऊन मानव हितासाठी त्यांच्या विचारांची अंमलबजावणी केली पाहिजे. समाजाला दिशा देण्याचे काम या थोर समाजसुधारकांनी केले. ते काम अविरत चालले पाहिजे. त्यांच्या विचारांच्या विरूद्ध होणाऱ्या कृती टाळल्या पाहिजेत. असे मत अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात बार्टीचे प्रतिनिधी तालुका समन्वयक, अभ्यासिका समन्वयक सुनिता वत्तुरकर यांच्यासह २६० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आयुक्त अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासिकेत अद्ययावत ग्रंथालय, मोफत स्पर्धा परीक्षा वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत नुकताच प्रशासकीय ठराव देखील करण्यात आल्याची माहिती लेंगरेकर यांनी दिली.