मीरारोड - शहरातील हवेतले प्रदूषण एकीकडे वाढले असताना प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना करत असल्याचा दावा मीरा-भाईंदर महानगरपालिकेने केला आहे. परंतु दुसरीकडे घातक असे प्रदूषणकारी फटाके स्टॉलला वारेमाप नियमबाह्यपणे परवानग्या महानगरपालिकेने हवेतील प्रदूषण रोखण्याचा पालिकेचा हा कांगावा असल्याची टीका होत आहे.
शासनाच्या गृह विभागाच्या आदेशा नुसार देखील सार्वजनिक ठिकाणी , गर्दीच्या ठिकाणी तसेच निवासी इमारती मध्ये फटाके विक्रीस परवाने देता येत नाहीत. भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा फटाके विक्रीचे परवाने मोकळ्या पटांगणात देण्याचे आदेश दिलेले आहेत.
फटाके विक्री करण्यासाठी मोकळ्या मैदानां मध्ये स्टॉल ना परवानगी देणे, नागरी वस्ती वा रहदारीचे रस्त्यांवर फटाके स्टॉलना परवानगी देता येत नाही. कारण फटाके हे अतिशय ज्वलनशील असल्याने फटाके दुकानांना आगी लागुन जीवघेण्या दुर्घटना झाल्या असल्याने फटाक्यांच्या विक्री स्टॉल करीता काटेकोर नियम व निकष घालुन दिले आहेत.
परंतु मीरा भाईंदर महापालिकेने उच्च न्यायालयाचे आदेश , शासन आदेश व भारतीय विस्फोटक कायद्याला धाब्यावर बसवून सर्रास नियमबाह्यपणे भर वर्दळीच्या रस्त्यांवर , नाक्यांवर फटाके विक्री स्टॉल ना परवाने दिले आहेत . विशेष म्हणजे पोलिसांनी देखील महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकत ना हरकत दिली आहे.
यंदा पालिकेने ११० फटाके स्टॉल ना परवानगी दिली असून महापालिकेने इंद्रलोक नाका परिसर, बाळाराम पाटील मार्ग, शिवसेना गल्ली नाका, राहुल पार्क, मीरारोड रेल्वे स्थानक बाहेरील मार्केट च्या मुख्य रस्त्यांवर, सिल्वर पार्क परिसर, कनकिया व हटकेश असे शहरात अनेक रस्ते व नाक्यांवर लोकांच्या जीवाशी खेळत फटाका स्टॉल ना परवाने दिले आहेत.
हरित फटाके व प्रदूषण न करणाऱ्या फटाक्यांना प्रोत्साहन देण्या ऐवजी महापालिकेने सर्रास घातक असे प्रदूषणकारी फटाके स्टॉल ना नागरीकांच्या जीवाशी खेळत कायदे - नियम धाब्यावर बसवून परवाने दिले आहेत.
हा फटाके स्टॉल परवाना घोटाळा असून या प्रकरणात संबंधित महापालिका अधिकारी यांना निलंबित करावे, त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलम नुसार गुन्हा दाखल करावा . नियमबाह्य प्रदूषणकारी फटाके स्टॉल तोडून साहित्य जप्त करावे अशी मागणी सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता, गो ग्रीन फाउंडेशनचे इरबा कोनापुरे आदींसह अनेक जागरूक नागरिकांनी केली आहे.