ठाणे: चालकाला मारहाण करुन पिकअप जीपमधील सामानाची लुटमार करणा-या दुकलीपैकी महंमद बिलाल खान (३०, रा. मीरा रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्याला ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पुणे जिल्हयातील फुलगाव, ता. हवेली येथील रहिवाशी रोहित भगत (२३) यांची पिकअप गाडी आहे. या गाडीत इंडझ टॉवर कंपनीचे सामान घेऊन शनिवारी पहाटेच्या सुमारास ते भिवंडीकडे निघाले होते. शनिवारी पहाटे ३ ते ४ वाजताच्या सुमारास विश्रांतीसाठी त्यांनी गाडी घोडबंदर रोडवरील महापालिका थीम पार्कजवळील रस्त्याच्या कडेला उभी केली. मोबाईल आणि पॉकेट डॅश बोर्डवर ठेवून चालकाच्या सिटवरच ते आराम करीत होते. याचदरम्यान भगत यांना आपली गाडीतील सामान कोणीतरी उतरवत असल्याची जाणीव झाली. त्यांचा मोबाईल आणि पॉकेटही गायब होते. गाडीला हादरे बसत असल्याचेही त्यांना जाणवल्याने त्यांनी उतरुन मागे येऊन पाहिले. त्यावेळी दोघेजण गाडीतील सिक्युरिटी सिस्टीम बॉक्सचे ६० हजारांचे सामान चोरुन ते रिक्षामध्ये भरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या चोरटयांना प्रतिकार केला तेव्हा ते रिक्षा घेऊन पळू लागले. त्यानंतर चोरटयांनी रिक्षातून उतरून भगत यांना मारहाणही केली. याप्रकरणी भगत यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात जबरी चोरीची तक्रार ८ डिसेंबर रोजी दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले आणि निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले यांच्या पथकाने मीरा रोड भागातून रिक्षासह खान याला शनिवारी रात्री ९ वा. च्या सुमारास अटक केली. त्याच्या रिक्षामधून इतरही चोरीतील मालासह मोबाईल असा दीड लाखांचा माल हस्तगत केला आहे. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याच्या अन्यही साथीदाराचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.-------------
चालकास मारहाण करून लुटमार करणाऱ्या टोळीतील एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 9:47 PM
पहाटेच्या वेळी चालक झोपेत असल्याची संधी साधत मीरा रोडच्या दोघा लुटारुंनी शनिवारी पहाटे एका पिकअप गाडीतील ६० हजाराच्या मालावर डल्ला मारला होता. कासारवडवली पोलिसांनी अवघ्या २४ तासातच यातील महमद बिलाल खान या चोरटयाला रिक्षासहित अटक केली आहे.
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाई शनिवारी पहाटे केली होती लुटमाररिक्षातून झाले होते पसार