लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एकीकडे कोरोनामुळे वीजग्राहकांना दिलासा देण्याची मागणी लावून धरली जात असताना दुसरीकडे महावितरणने भांडुप परिमंडळातील थकबाकीदार असलेल्या एक लाख ४४ हजार वीज ग्राहकांची वीजजोडणी तोडण्याची मोहीम उघडली आहे. महावितणच्या या कारभाराच्या विरोधात गुरुवारी भाजपने आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयात अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन केले.कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यात महावितरणने सरासरी हजारोंची बिले पाठवून ग्राहकांचे कंबरडे मोडण्याचे काम केले. यांना दिलासा द्यावा, यासाठी भाजप आणि मनसेने शासनाकडे पाठपुरावा केला होता. असे असतानाही तो देण्याऐवजी आता त्यांची वीजजोडणी तोडण्याचे काम महावितरणने केले आहे. त्यानुसार बुधवारपासून भांडुप परिमंडळातील एक लाख ४४ हजार ग्राहकांची वीजजोडणी खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. महावितरणच्या या धोरणाविरोधात केळकर यांनी गुरुवारी हे आंदोलन केले. या वेळी जोपर्यंत ही वीजतोडणी मोहीम थांबत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वीजतोडणी कारवाई थांबवली जाईल, असे आश्वासन दिले. ज्यांची थकबाकी ५० हजारांहून अधिक आहे, त्यांच्याकडूनही टप्प्याटप्प्याने वसुली करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले असल्याची माहिती केळकर यांनी दिली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
दीड लाख ग्राहकांची वीजजोडणी तोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:58 AM