ठाणे : राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षलागवड मोहीम राबवण्यात येत आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यातदेखील ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ठाणे वनविभागामार्फत सन २०१७ आणि १८ या दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे २० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी एक लाख ५७ हजार ७६१ झाडे मृत पावली असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून उघड झाली आहे.
कधी अतिवृष्टी, कधी पूर तर कधी चक्रीवादळ यामुळे बऱ्याचदा निसर्गचक्र विस्कळीत होते. याशिवाय, वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल हे मुद्दे गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टामध्ये सन २०१७ मध्ये चार कोटी वृक्षलागवड केली गेली.
गेल्या वर्षी जगले १३ लाख वृक्ष२०१८ मध्ये १३ लाख ९१ हजार ३५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यापैकी १३ लाख १९ हजार ६९६ वृक्ष जगली असून ७१ हजार ६५५ वृक्ष मृत पावली असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यासाठी शासनाच्या वतीने विविध विभागांमार्फत नियोजन करत वृक्षलागवड करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात वृक्षलागवड मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ठाणे वनविभागाच्या वतीनेदेखील वृक्षलागवड करण्यात आली होती.
या विभागामार्फत लागवड केलेल्या वृक्षांपैकी सुमारे ८ ते १० टक्के वृक्ष मृत पावले असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दरम्यान, सन २०१७ मध्ये वनविभागाच्या वतीने पाच लाख ७४ हजार ७१६ वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी चार लाख ८८ हजार ६१० वृक्ष जगली असून ८६ हजार १०६ वृक्ष मृत पावले.