ठाणे : भारतामधील किमान दीड हजार मुलांना शिक्षणाकरिता अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांत धाडलेल्या एका कंपनीचा फोन दररोज खणखणत आहे. आपल्या मुलांच्या चिंतेने त्यांचे पालक हवालदिल झाले आहेत. अमेरिकेतील बहुतांश शहरांतील आणीबाणी १५ एप्रिल रोजी कोरोनाचा प्रसार पाहून उठण्याची शक्यता आहे. त्यानंतरच तेथील भारतीयांना पुन्हा परत यायचे की तेथेच राहायचे, याचा निर्णय घेणे शक्य होणार आहे.विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणाकरिता जाण्यास मदत करणाऱ्या एजन्सीचे दिलीप ओक यांनी सांगितले की, अमेरिकेत भारतासारखी छोटी दुकाने नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीकरिता साऱ्यांना मॉलमध्येच जावे लागते. भारतातून शिक्षणाकरिता गेलेले विद्यार्थी सध्या त्यांच्या घरातच बंद असून आम्ही पाठवलेले दीड हजार विद्यार्थी सुखरूप आहेत. कुणालाही कोरोनाची बाधा झाल्याचे समजलेले नाही. भारतीय मुलांना डाळभात मिळाला, तरी ते राहू शकतात. अर्थात, अनेक विद्यार्थ्यांचे पालक मुलामुलींच्या काळजीपोटी फोन करीत आहेत. विचारणा करीत आहेत. मात्र, चिंतेचे कारण नाही.कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क वगैरे शहरांत लागू केलेली आणीबाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून १५ एप्रिलपर्यंत उठवण्याचा निर्णय होईल. त्यानंतरच विद्यार्थी आॅनलाइन परीक्षा देऊन लागलीच भारतात येतात की, त्यांना कोरोनाचा ताप वाढल्याने तेथेच अडकून पडावे लागते, ते कळेल, असे ओक यांनी स्पष्ट केले. सध्या अमेरिकेत व भारतात कोरोनाचा प्रसार वाढला असताना विमान प्रवास टाळून घरी राहणे अधिक चांगले आहे, असेही ते म्हणाले.
दीड हजार विद्यार्थी १५ एप्रिलपर्यंत अमेरिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:15 AM