ठाणे : दिवा येथील रहिवासी असलेल्या मोनुकुमार पासी यांच्या दीडवर्षीय आकाश बाळाचे चार दिवसांपूर्वी पाच लाखांच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक आणि मुंब्रा पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास करून पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून नागेश पासी याला अटक करून आकाशची सुखरूप सुटका केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी शुक्रवारी दिली.
दिवा येथून ६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मोनूकुमार पासी यांचा लहान भाऊ अवधेशकुमार आणि त्याचा मित्र नागेश पासी हे दोघे आकाश याला फिरायला घेऊन गेले होते. तेव्हा, अवधेशची दिशाभूल करून नागेशने आकाशचे अपहरण केले होते. याचप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात ६ जुलै रोजी नागेश पासी याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर, ११ जुलै रोजी अपहरणकर्ता नागेश याने आपल्या मोबाइलवरून आकाश याचा उत्तर प्रदेश येथील चुलत काका लवकुश पासी यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. या फोननंतर पोलिसांनी आरोपीच्या लोकेशनची तांत्रिक माहिती मिळवून १२ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून नागेशला ताब्यात घेऊन आकाशची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. अटकेपूर्वी नागेशने मुंबई सेंट्रल येथूनही आकाशच्या वडिलांना फोन केला होता.
त्यानंतर, बोईसर आणि मुंबई सेंट्रल अशा दोन्ही ठिकाणी त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने त्याला अटक केली. या मुलाची सुखरूप सुटका केल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले.