ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून एका वीसवर्षीय महिलेचा कोपरी येथे विनयभंग करून नंतर पुणे आणि थेऊर येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणा-या राजेश अंबर मोरे (२२, रा. समतानगर, ऐरोली, नवी मुंबई) याला कोपरी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पतीशी सूत न जुळल्याने पीडिता गेल्या काही दिवसांपासून विभक्त झाली होती. दरम्यान, तिचा बालपणीचा मित्र राजेश याच्याशी तिची फेसबुकमार्फत पुन्हा ओळख झाली. याच ओळखीतून त्याने तिचा विश्वास संपादन केला. याचा फायदा घेऊन त्याने ठाण्यातील कोपरी बसथांब्याजवळील तलावाच्या ठिकाणी तिच्याशी हितगुज करताना तिचा विनयभंग केला. त्यानंतर, पुन्हा तिच्याशी जवळीक साधून तिला स्कूटरवरून पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे नेले. तिथे लग्नाचे आमिष दाखवून भाड्याने खोली घेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१८ या काळात घडला. तिने लग्नासाठी त्याच्याकडे आग्रह धरल्यानंतर मात्र आईवडिलांनी आपल्या विवाहाला नकार दिल्याचे कारण देऊन त्याने लग्नास नकार दिला. फसवणुकीने लैंगिक अत्याचार केल्याचे तिच्या लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली. या प्रकाराला सुरुवात कोपरी येथून झाल्याने हे संपूर्ण प्रकरण कोपरी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले. १३ डिसेंबर २०१८ रोजी याप्रकरणी विनयभंग आणि लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कविता गायकवाड, महिला उपनिरीक्षक एस.एस. जगताप, हवालदार तुकाराम डुंबरे आणि काशिलिंग खरात यांच्या पथकाने १९ डिसेंबर रोजी रात्री ११ वा.च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकाजवळील शिवम हॉटेलजवळून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: December 20, 2018 9:55 PM
लग्न करण्याच्या नावाखाली आपल्याच विवाहित मैत्रिणीला पुण्यातील थेऊर येथे नेऊन लैंगिक अत्याचार करणा-या राजेश मोरे याला कोपरी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. कुटूंबियांच्या नकारामुळे तिला लग्नाला नकार दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
ठळक मुद्देकोपरी पोलिसांची कारवाई पुण्याच्या थेऊर भागात नेऊन अत्याचारबालमैत्रिणीशी फेसबुकमार्फत झाली होती ओळख