मीरारोड - मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटर मधील एका गाळ्यातून पोलिसांनी इलेक्ट्रिक सिगारेटच्या साठ्यासह एकास अटक केली आहे. वसई विरार पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी शाखेचे पोलीस निरीक्षक अमर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मीरारोडच्या शांती शॉपिंग सेंटर मधील गाळा क्रमांक ४० वर कारवाई केली.
सदर गाळ्यातून बंदी असलेली इलेक्ट्रिक सिगारेट विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल आंबवणे सह अजय सपकाळ , डी . एस . इंगळे , पी . डी . पाटील , व्ही . ए . घरबुडे यांच्या पथकाने धाड टाकली.
त्या गाळ्यात असलेल्या रशीद अमजद खान (२३) रा . रेडियम सोसायटी , रेल्वे समांतर मार्ग , नया नगर , मीरारोड ह्याच्या कडे चौकशी करून झडती घेतली असता १४ हजारांचे १४ इ सिगारेट्स सापडले . त्याच्या कडे सदर सिगारेट कुठून आणल्याची चौकशी केली असता त्याने शेजारीच असलेल्या वन स्टॉप म्युझिक शॉप दुकानातील वाहिद व ईसा इब्राहिम शेख रा. रेडियम सोसायटी यांनी विक्रीसाठी दिल्याचे सांगितले . पोलिसांनी त्या दुकानात तपासणी केली असता काही आढळून आले नाही . या प्रकरणी नया नगर पोलीस ठाण्यात राशिद वर ६ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.