मीरारोड - शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना साठी पात्र महिलांना नोंदणी करून लाभ मिळवता यावा म्हणून मीरा भाईंदर महापालिकेने ६ प्रभाग अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नोंदणी केली असून मदत कक्ष पण सुरु केला आहे.
शासनाच्या निर्णया नंतर मीरा भाईंदर मधील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आर्थिक लाभ मिळवता यावा म्हणून महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी महिलांसाठी मदत तसेच नोंदणी कक्ष सुरु केला आहे . पालिकेच्या ६ प्रभाग समित्या असून प्रत्येक प्रभाग समिती अधिकाऱ्याची योजनेसाठी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे .
महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक नोंदणी करणे तसेच योजने बॅटची माहिती , पात्रता ह्यासाठी प्रभाग अधिकारी यांना संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले आहे . प्रभाग अधिकारी हे योजनेची माहिती देतीलच शिवाय योजनेसाठी ऑफलाईन अर्ज भरून घेणे , नारीशक्ती दुत ऍप वर ऑनलाईन अर्ज भरणे , अर्ज स्वीकारणे व अर्ज भरण्यास महिलांना मदत करण्याचे काम हे समन्वय अधिकारी करणार आहेत .
२१ ते ६५ ह्या वयोगटातील महिला सदर योजनेसाठी पात्र ठरणार आहेत . आधार कार्ड , अधिवास प्रमाणपत्र , अधिवास प्रमाणपत्र नसेल तर १५ वर्षां पूर्वीचे राज्यातल्या वास्तव्य बद्दलचे रेशनकार्ड , मतदार ओळखपत्र , जन्म दाखला , शाळा सोडल्याचा दाखला पैकी एक पुरावा लागणार आहे . उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे तसेच केशरी रेशनकार्ड असले पाहिजे . अर्जदार महिलेचे हमीपत्र , बँक पासबुक , महिलेचा जन्म पर राज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र वा १५ वर्षां पूर्वीच्या वास्तव्याचा पुरावा लागणार आहे .
आवश्यक कागदपत्रे हि नारीशक्ती दूत ऍप वर अपलोड केली जाणार आहेत . शहरातील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चा लाभ घ्यावा व त्यासाठी महापालिका सर्व ते सहकार्य करेल असे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले आहे .