ठाणे : खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक करणाऱ्या दिलीप आणि दीप्ती नाईक या दाम्पत्याविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.नाईक दाम्पत्याने जून २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये भायखळा येथील बिपिन जाधव (४२) यांच्या रुद्रा ग्रुप या टूर अॅण्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात येऊन टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स या क्षेत्रात काम करत असल्याची बतावणी केली. त्यामुळे त्यांच्याशी व्यवहार केल्यास कंपनीचा फायदा होणार असल्याचाही दावा केला. पहिल्या व्यवहारात जाधव यांचा त्यांनी विश्वास संपादन करून इतर प्रवाशांच्या तिकीट आणि राहण्याचा खर्चाची रक्कम जाधव यांच्या कंपनीकडून उधारीवर (क्रेडिट) घेतली.या व्यवहारामध्ये जाधव यांनी पैशांची मागणी केली असता, त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत या व्यवहारातील एक कोटी ३४ लाख ९५ हजार २४५ रुपये इतकी रक्कम परत न देता नाईक दाम्पत्याने त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. नाईक यांच्याकडे या रकमेसाठी तगादा लावूनही त्यांनी ती परत न केल्याने अखेर जाधव यांनी २५ मे रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
एक कोटी ३४ लाख ९५ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 1:07 AM