ठाणे: एका महागडया ऑडी कारसह मोबाईल आणि सोन्याचे दागिने, असा तब्बल एक कोटी दहा लाख रुपयांचा ऐवज, नौपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या हस्ते गुरुवारी संबंधित १६ फिर्यादींना सुपूर्द करण्यात आला. पोलिसांकडून आपला ऐवज सुखरुप परत मिळाल्याबद्दल या फिर्यादींनी समाधान व्यक्त केले आहे.
आपल्याला मिटिंगला जायचे असल्याचे कारण देत, सउद आलम खान (४२, रा. मुंब्रा) यांची ऑडी कार त्यांचा मित्र ललित शर्मा याने काही दिवसांपूर्वी घेतली होती. यानंतर, त्याने तिची परस्पर विक्रीही केली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहायक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, उपनिरीक्षक विनोद लभडे आणि पोलीस कॉन्स्टेबल किशोर काळे आदींच्या पथकाने भिवंडीतून शशी शर्मा आणि पवन तिवारी या दोघांना ७ मे २०२२ रोजी अटक केली होती. त्यानंतर हुंडकेश्वर, नागपूर येथून अजय बुरले याच्याकडून वळतकर यांच्या पथकाने १२ मे रोजी ही मोटारही जप्त केली होती. याच मोटारीची चावी १६ जून रोजी सऊद खान यांना सुपूर्द करण्यात आली.
आणखी एका प्रकरणात घरात घुसून घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि इतर ऐवज चोरणाऱ्या करण राजेंद्र वाघमारे (२५, रा. ठाणे) याच्यासह दोघांना अलिकडेच नौपाडा पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून ७४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. तो यातील तक्रारदार रवींद्र कारेकर यांना सुपूर्द करण्यात आला.
जबरीने चोरी केलेले सहा मोबाईलही शोधून तेही मूळ मालकास गुरुवारी परत करण्यात आले. मोबाईल शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे यांच्यासह विशेष पथकाची स्थापना केली होती. याशिवाय, आरती वाळंज (३३) यांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा चोरीस गेलेला ८१ हजारांचा ऐवज, दीपिका गंगुत्रेक (५०) यांचे जबरीने चोरलेले ४५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, रोहित कदम (३६) यांची चोरीस गेलेली स्कूटर अशा तब्बल १६ फिर्यादींचा एक कोटी दहा लाखांचा ऐवज त्यांना सुखरुप सुपूर्द करण्यात आल्याचे धुमाळ यांनी सांगितले. धुमाळ यांच्यासह निरीक्षक आनंद निकम, सहायक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी आणि उपनिरीक्षक विनोद लभडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.