ठाणे : ‘भारत के वीर की सवारी’ या मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून शहिदांच्या कुटुंबांसाठी एक कोटींची निधी गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहे. रोटरी क्लबने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रोटरी क्लब आॅफ ठाणे एसस आणि रोटरी डिस्ट्रिक्ट शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढे सरसावली असून यानिमित्ताने हजारोंच्या उपस्थितीत ‘भारत के वीर की सवारी’ मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ मंगळवारी सकाळी ७ वा. उपवन तलाव, ठाणे येथे मुंबई कुलाबा आर्मीचे कर्नल बिनिश नायर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी रोटरीचे अशोक महाजन, डॉ मोहन चंदावरकर, हरजीत तलवार, मिहीर पटेल, डॉ. संजीव जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
‘भारत के वीर की सवारी’मध्ये एकूण १४ मोटारसायकल राइड रॅली ग्रुप असून यामध्ये २ महिला व १२ पुरु ष आहेत. शहीदांच्या कुटंबासाठी एक कोटींचा निधी गोळा करणे व मेक इंडिया माध्यमातून सकारात्मक निरोगी आरोग्य जागरूकता अभियान आणि भारतातील रोटरीची १०० वर्षे या निमित्ताने होणारा उत्सव या तीन माध्यमांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या मोटारसायकल राइडने ठाणे येथून प्रस्थान केले.
गोल्डन चतुर्भुज राष्ट्रीय महामार्गाने दिल्ली, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोर ते ठाणे या मार्गाने ६१२० किमीचा प्रवास, १७ दिवसात करणार आहेत. यावेळी भारतातील १३ राज्य, ८० शहरांमधील रोटरी क्लब व सशस्त्र दल स्थानकांना ते भेट देणार आहेत. भारत के वीर की सवारीचा समारोप २६ डिसेंबर रोजी ठाणे येथे होणार आहे.