ठाणे: सुवर्ण योजनेमध्ये गुंतवणूकीचे अमिष दाखवून फसवणूक करणा-या संतोष शेलार या ज्वेलर्स दुकानाच्या मालकाला आता ६ जुलैपर्यंत ठाणे न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. या योजनेतून ५९७ जणांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांच्या चौकशीतून उघड झाली आहे.पातलीपाडा येथील त्रिमुर्तीरत्न ज्वेलर्सचा मालक संतोष शेलार (५१) याने आपल्या दुकानामार्फत सोने खरेदी करणाऱ्यांना विविध योजनांच्या नावाखाली आकृष्ट केले होते. त्याच्या योजनेनुसार १५ महिन्यांमध्ये १५ हजार रुपये तसेच व्याजाचे तीन हजार असे प्रत्येकी १८ हजार रुपये किंवा त्याच भावातील सोन्याची वस्तू देण्याचे ठरले होते. त्यानुसार त्याने सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे नफा मिळवून दिला. काहींना पैसेही मिळवून दिले. फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात राबाविलेल्या या योजनेमध्ये रामचंद्रनगर, वैतीवाडीतील प्रिया जाधव आणि त्यांचा मुलगा यांच्याकडून प्रति महिना एक हजार रुपये असे १५ महिने ३० हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना मुदतपूर्तीनंतर देय असलेली ३६ हजारांची रक्कम मात्र त्याने दिलीच नाही. अशा प्रकारे सुमारे १५० गुंतवणूकदारांचे चार लाख १७ हजार ५०० रुपये त्याने उकळले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात २७ जून २०१७ रोजी फसवणूकीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अविनाश सोंडकर आणि संजय धुमाळ यांच्या पथकाने शेलारला अवघ्या काही तासांमध्ये अटक केली. चौकशीमध्ये या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून गेल्या पाच दिवसांमध्ये ५९७ गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार नोंदविली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ११ लाखांची रक्कम शेलारने उकळल्याचे उघड झाले आहे. त्याच्याकडे कळवा, रामचंद्रनगर, नौपाडा, पाचपाखाडी आदी ठाणे परिसरातील गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले होते. काहींची तर त्याने दलाल म्हणून नियुक्ती करुन त्यांना एक ते तीन टक्के दलाली तो बक्षिसी म्हणून वाटत होता. या सुमारे ४०० दलालांनी त्यांचे मित्र, नातेवाईक यांना या सुवर्ण भीसीचे महत्व पटवून दिले. दलालांना या साखळीतून पैशांचा परतावा मिळण्यासाठी त्याने एका संगणकीय सॉफ्टवेअरचाही उपयोग केला होता. चार पगारी कर्मचारीही त्याने आपल्या दुकानात या योजनेसाठी नेमले होते.या योजनेनुसार १५ महिने गुंतवणूक केल्यास मुद्दल अधिक व्याज अशी रक्कम परतावा किंवा सोन्याचे दागिने देण्याचे गुंतवणूकदारांना अमिष दाखविले होते. गेल्या दोन वर्षामध्ये त्याने सुमारे ६०० जणांची अशा प्रकारे एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे आतापर्यंतच्या तपासामध्ये उघड झाले आहे. यात आणखीही आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या गुंतवणूकदारांची यामध्ये फसवणूक झाली असेल त्यांनी नौपाडा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोंडकर यांनी केले आहे.
सुवर्ण भीसी योजनेतून ५९७ गुंतवणूकदारांची एक कोटींची फसवणूक
By जितेंद्र कालेकर | Published: July 03, 2019 9:56 PM
जादा व्याजाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संतोष शेलार या सराफाने ५९७ गुंतवणूकदारांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याने आकर्षक टक्केवारी देऊन यासाठी ४०० दलालांचीही नियुक्ती केली होती.
ठळक मुद्देआरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ४०० दलालांचाही समावेश दलालांना मिळायची एक ते तीन टक्के रक्कम