ठाणे : शासनाने जिल्हा नियोजन समितीमार्फत प्रत्येक जिल्ह्यास एक कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यालाही हा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून जिल्ह्यातील लम्पी रोगामुळे मृत जनावरांच्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात या लम्पी रोगाने मृत पावलेल्या जनावरांच्या पशुपालकास नुकसान भरपाई देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी म्हणजे बैलासाठी २५ हजार आणि मृत वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई मिळणार आहे, असे डॉ. तोडनकर यांनी सांगितले आहे. सध्या लम्पी त्वचारोगाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढविला आहे. त्यामुळे लम्पी त्वचा रोग नियंत्रणात आहे. या रोगाने बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येत असून लसीकरण, उपचार व शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत.
सध्या जिल्ह्यात एकूण २७ केंद्रबिंदू आहेत. एकूण १०४ जनावरे बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण चार जनावरे या रोगाने मृत झाली आहेत. ठाणे जिल्ह्यात एकूण ८० हजार ५३२ इतके गो-वर्गीय पशुधन आहे. त्यापैकी आतापर्यंत १६ हजार ९६५ जनावरांचे लसीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे. लसीकरण ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या लम्पी त्वचा रोगाचा प्रसार व हानी पाहता राज्य शासनामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे लम्पी त्वचा रोग नियंत्रणात आणण्यास पशुसंवर्धन विभागास यश येत असल्याचे डॉ. तोडनकर यांनी सांगितले.