ठाणे : महाराष्ट्रात गुटख्याला बंदी असताना पालघर जिल्ह्यातील चारोटीनाक्यावरून गुजरातमधून चोरट्यामार्गे राज्यात येणारा एक कोटीहून अधिक रुपये किमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी जप्त केला. राज्यातील मागील आठ दिवसांतील दुसरी मोठी कारवाई असून पहिल्या कारवाईत सुमारे दीड कोटीहून अधिक किमतीचा गुटखा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी गुटख्याविरोधात मोहीम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुटख्याविरोधात मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याचदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सहआयुक्त (दक्षता ) सुनील भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, १८ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजल्यापासून ते १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत पालघर जिल्ह्यातील अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील चारोटीनाक्यावर सापळा लावला होता. यावेळी गुजरात राज्यातून तस्करी होणारे तीन ट्रक मिळून आले. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पानमसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखूच्या ५०२ बॅगा निदर्शनास आल्या. तो साठा जप्त केला असून त्याची किंमत एक कोटी पाच लाख ९६ हजार रुपये इतकी आहे. यामध्ये ट्रकची किंमत वजा करण्यात आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एफडीएने दिली. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न, गुप्तवार्ता) दिलीप सावंत, अन्न सुरक्षा अधिकारी खडके, कांडेलकर, महाले, घोसलवाड, जगताप चव्हाण या पथकाने केली.पाच वर्षांत १७५ कोटींचा साठा ताब्यातपरभणी कार्यालयाने १३ आॅक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत एका ट्रकमधून २३५ बॅट गुटख्याचे तयार मिक्सर आढळून आले आहे. या साठ्याची किंमत एक कोटी ६४ लाख ५० हजार रुपये एवढी असून त्याप्रकरणी ट्रकचालकासह क्लीनर आणि मालकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मागील पाच वर्षांत राज्यात केलेल्या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाने सुमारे १७५ कोटींहून अधिक किमतीचा साठा जप्त केल्याची माहिती सहआयुक्त भारद्वाज यांनी दिली.