लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भारतीय चलनातून रद्द झालेल्या हजार आणि पाचशेच्या एकूण १ कोटीच्या जुन्या नोटा कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी रात्री घोडबंदर रोडवर जप्त केल्या आहेत. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांनी ही रक्कम चोरून आणली असावी, असा संशय आहे. या नोटांमध्ये एक हजाराच्या ९ हजार ९८५, तर पाचशेच्या ३० नोटा असून, त्या एका साप्ताहिकाचा पत्रकार घेऊन आल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ-५चे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चलनातून रद्द केलेल्या जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा कमिशन बेसिसवर बदलण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती कासारवडवलीचे पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांना मिळाली होती. त्यानुसार, शुक्रवारी रात्री पोलीस पथकाने सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीत एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. त्यानंतर, पोलिसांनी बदलापुरातील सुरेश झोंडगे, मलकान पवार, मिल लुभाना, डोंबिवलीतील उत्तम पाटील, कल्याणातील नरेश कुलकर्णी, पनवेलचा अमोल शिंदे अशा सहा जणांना ताब्यात घेतले.
ठाण्यात एक कोटीच्या जुन्या नोटा जप्त
By admin | Published: July 02, 2017 4:38 AM