मीरारोड - भार्इंदर पुर्वेला मध्यपी मित्रां मध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यु झाला असून, एकजण जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री नंतर दीडच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलीसांनी काहींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.भार्इंदर पुर्वेच्या गोडदेव नाका जवळ अयोध्या इमारती मागे बालाजी इंटस्ट्रीयल इस्टेट आहे. सदर ठिकाणी एका तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याचे तसेच एकजण रक्ताच्या थारोळ्यात जख्मी अवस्थेत पडला असल्याची माहिती मिळताच नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग, निरीक्षक सुरेश गेंगजे सह नवघर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीसांना घटनास्थळी अच्युत गुलाब चौबे (२७) रा. ओस्तवाल निकेतन, खारीगाव हा मृतावस्थेत पडलेला होता. तर जख्मी विवेक सिंग उर्फ बंटी याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पोलीसांना सापडलेल्या एका कॅमेऱ्याच्या फुटेज मध्ये चौघे जण जाताना दिसत आहेत. रात्रीच्या वेळी हे सर्व मद्यपान करत बसले असावे व त्यांच्यात वाद होऊन अच्युतची हत्या तर विवेक जख्मी झाला असावा असे पोलीस सुत्रांचे म्हणणे आहे. झाडाच्या फांदीचा लाठी म्हणुन वापर केला असुन डोक्यावर जबर प्रहार झाल्याने अच्युतचा मृत्यु झाल्याचे सुत्रांनी सांगीतले.पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यावर ते जातीने नवघर पोलीस ठाण्यात बसुन ताब्यात घेतलेल्या संशयीतांची चौकशी करत आहेत. सायंकाळ पर्यंत जख्मी विवेक याचा जबाब नोंदवण्यात आला नव्हता. अच्युत हा बाळाराम पाटील मार्गावरील श्याम भवन मध्ये चायनिजचे हॉटेल चालवायचा. त्याचे व भावाचे मीरारोडच्या रसाज सिनेमागृह जवळ कपड्याचा व्यवसाय आहे. त्यात नुकसान झाल्याने पैशां वरुन वाद सुरु असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.हा औद्योगिक गाळ्यांचा परिसर असल्याने रात्री शुकशूकाट असायचा. त्याचाच गैरफायदा मद्यपान वा नशा करण्यासाठी घेतला जात होता. अयोध्या निवास मध्ये राहणारे सुरजप्रकाश म्हणाले की, मद्यपींचा वावर असल्याने आपण येथे सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. पण शुक्रवारी रात्रीच तो तोडण्यात आला होता. पोलिसांकडून अच्युतच्या हत्येचे नेमके कारण व घडलेल्या प्रकाराची माहिती अद्याप दिली गेलेली नाही.
मद्यपी मित्रांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू, एकजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 10:04 PM