भाईंदर : भाईंदर पश्चिमेस क्रॉस गार्डनजवळ एका मोठ्या उंबराच्या झाडाची फांदी तुटून पडल्याने रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या एकाचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. झाडाच्या बुंध्याभोवती सुमारे तीन फूट इतका डेब्रिजचा भराव केल्याने झाड कमकुवत झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डनसमोर चंदुलाल वाडी आहे. या वाडीतील जुने उंबराचे भले मोठे झाड आहे. शनिवारी सकाळी झाडाखालून दुचाकीने जाग्रम रामविलास प्रजापती (वय ४१) हे मुलगा अमित सोबत दुचाकीवरून जात होते. अचानक झाडाची मोठी फांदी तुटून खाली पडली. ही फांदी प्रजापती यांच्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला, तर मुलास इजा झाली. फांदी पडल्याने रस्ता बंद झाला होता. महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा केला.
बुंध्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव केल्याने झाड कमकुवत झाले आहे. त्यातूनच फांदी मोडून पडली. उंबराचे झाड खूप मजबूत असल्याने असे फांदी वगैरे तुटण्याचे प्रकार होत नाहीत. तातडीने झाडाच्या बुंध्याशी टाकलेले डेब्रिज पालिकेने काढून घ्यावे, असे वृक्षमित्र रोहित जोशी म्हणाले.