मीरारोड - भाईंदर पश्चिमेस क्रॉस गार्डनजवळ एका मोठ्या उंबराच्या झाडाची फांदी तुटून पडल्याने रस्त्यावरून दुचाकीने जाणाऱ्या एका व्यक्तीचा त्यात मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून झाडाच्या बुंध्याभोवती सुमारे ३ फूट इतका डेब्रिसचा भराव केल्याने झाड कमकुवत झाल्याचे वृक्षतज्ञांनी म्हटले आहे.
भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन समोर चंदुलाल वाडी आहे. सदर ठिकाणी मुख्य रस्त्यालगत असलेल्या वाडीतील जुने उंबराचे भले मोठे झाड आहे. शनिवारी सकाळी झाडा खालून रस्त्यावरून दुचाकीने पटाडिया कॉम्प्लेक्स समोरील झोपडपट्टीत राहणारे जाग्रम रामविलास प्रजापती ( ४१ ) हे मुलगा अमित सोबत दुचाकीवरून चालले होते. अचानक झाडाची मोठी फांदी तुटून खाली पडली. फांदी प्रजापती यांच्यावर पडल्याने डोक्याला जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. तर मुलास इजा झाली. फांदी पडल्याने रस्ता बंद झाला होता.
महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या छाटून रस्ता मोकळा केला. सदर घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. बुंध्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिस आदींचा भराव केल्याने झाड कमकुवत झाले आहे. त्यातूनच फांदी मोडून पडली. उंबराचे झाड खूप मजबूत असल्याने असे फांदी वगैरे तुटण्याचे प्रकार होत नाहीत. तातडीने झाडाच्या बुंध्याशी टाकलेले डेब्रिस पालिकेने काढून घ्यावे असे वृक्षमित्र रोहित जोशी म्हणाले आहेत.