ठाणे:ठाणे शहरातील कोपरी पुलावरील खड्ड्यामुळे वागळे इस्टेट येथील रहिवासी विनीत भालेराव याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांना दहा लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची मागणी कॉंंग्रेसचे राहुल पिंगळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
ठाणे शहरात खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वागळे इस्टेट येथील जय भवानी नगर, सी. पी. तलाव येथे राहणारा विनीत भालेराव हा २६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी दुचाकीने मुंबई येथे जात होता. त्याचवेळी कोपरी पुलावर पडलेल्या खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे एका अवजड वाहनांच्या गर्दीतून जात असताना एका ट्रेलरखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्याच्या कुटुंबीयांना दहा लाखांची आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी पिंगळे यांनी केली.