डोंबिवली : गाडीने दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना घारडा सर्कल येथे घडली. तर, दुचाकीच्या धडकेत चारवर्षीय चिमुरड्यासह अन्य एक जण जखमी झाल्याच्या घटना कल्याण-डोंबिवली शहरांत घडल्या आहेत.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनांमुळे वाहतूक नियमांचे पालन न करता भरधाव वेगाने वाहने चालवून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरते आहे. पूर्वेतील सागर्ली गावात राहणारे निलेश शिंदे (३६) हे त्यांचा मित्र राजू नायडू (३८, रा. आजदेगाव) याच्यासोबत दुचाकीवरून दुपारी १ च्या सुमारास घरडा सर्कल परिसरातून जात होते. यावेळी समोरून भरधाव आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात शिंदे आणि नायडू हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान शिंदे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात शिंदे यांच्या पत्नीने तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी मोटारचालकाला अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेतील आरटीओ कार्यालयाजवळील सर्वोदय हाइट्समध्ये राहणाºया लक्ष्मी पारीख या गुरुवारी सकाळी ८ च्या सुमारास तनुज (४) या मुलाला शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. यावेळी वाणी विद्यालयाजवळील चौकात त्यांच्या दुचाकीस समोरून आलेल्या दुचाकीस्वाराने धडक दिली. यात तनुज रस्त्यावर पडल्याने जखमी झाला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिसरी घटना पश्चिमेतील दुर्गामाता चौक परिसरात दुपारी ३ च्या सुमारास घडली. इरशाद सुसे (४३, रा. भिवंडी) हे नातेवाइकांना भेटण्यासाठी गोविंदवाडी बायपासने जात होते. यावेळी भरधाव आलेल्या मोटारीने इरशाद यांना धडक दिली. यात ते जखमी झाले. बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.