अजित मांडके, ठाणे : कल्याण लोकसभेची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच महाविकास आघाडीचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे, कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई आदींसह इतर महत्वाच्या पदाधिकाºयांना शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवास्थानी भेट घेतली.
ठाणे आणि कल्याण लोकसभेबाबत तब्बल एक तास खलबते झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र यावेळी श्रीकांत शिंदे ची उमेदवारी जाहीर कोणी केली देवेंद्र फडणवीस यांनी. पण ते आता कोणत्या चिन्हावर लढणार असा सवाल यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला.
महायुतीकडून अखेर कल्याणचा उमेदवार जाहीर करण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाले आहे. परंतु ठाण्याचे नाव अद्यापही महायुतीकडून जाहीर झालेले नाही. असे असतांनाच श्रीकांत यांचे नाव जाहीर होताच, शनिवारी दुपारी आव्हाड यांच्या बंगल्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह महत्वाच्या पदाधिकाºयांमध्ये तासभर चर्चा झाली. या चर्चेत ठाणे आणि कल्याण लोकसभेची रणनिती ठरविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच कल्याणचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाण्याचा उमेदवार कोण असेल त्याला कसे सामोरे जायचे, महायुतीमधून इच्छुक असलेल्यांपैकी कोणीही आला तरी त्यासाठी कशी रणनिती आखली जाऊ शकते यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर पुढील प्रचाराची दिशा कशी असेल यावर देखील चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे, मला असे वाटते की मुख्यमंत्र्यांनीच टाळले असेल की माझ्या मुलाची उमेदवारी मी का जाहीर करावी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असेल. भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, त्याचे परिणाम आजच्या घडीला सांगू शकत नाही, ४४ दिवस अजून बाकी आहेत, ४४ दिवसानंतरच भविष्य सांगणे हे कोणत्या भविष्यकारालाही जमणार नाही.(जितेंद्र आव्हाड - आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट)-
मिंदे गटाचा उमेदवार जाहीर करण्यासाठी शेवटी कोण गेले तर देवेंद्र फडणवीस यातूनच समजून जा की त्यांच्यात काय सुरू आहे ते, मी आधीच सांगितल आहे की, तुम्हाला उमेदवार मिळत नसेल तर तुम्ही मला बिनविरोध निवडून द्या. पुढची प्रचाराची रणनीती आणि दिशा ठरवण्यासाठी आव्हाड यांची भेट घेतली.(राजन विचारे - उध्दव सेना - ठाणे उमेदवार)-
उपमुख्यमंत्र्यांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव जाहीर करणे हे दुर्देवी आहे. हिंगोली ची जागा एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार बदलायला लावला, कल्याणची जागा जाहीर झाली नाही आणि फडणवीस यांनी परस्पर उमेदवार जाहीर केला. यामुळे ते स्वत:ला दुसरी शिवसेना जी काही म्हणतात याचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत की देवेंद्र फडणवीस आहेत हेच समजत नाही. त्यांचे उमेदवार अद्याप ठरत नाही याला कारण भाजप आहे, शिवसेनेच्या प्रत्येक पारंपारिक मतदारसंघावर ती भाजप दावा करतेय त्यामुळे हे जे काही सांगायचे की आम्ही शिवसेना वाढवण्यासाठी बाहेर पडलो आज त्यांची काय परिस्थिती आहे हे आपण पाहू शकतो.(वरुण सरदेसाई - युवा सेना सचिव, उध्दव सेना)
श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार आहेत हे कोणाला माहित आहे का? कारण त्यांची उमेदवारी ही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे, ते नक्की कमळावर लढणार की धनुष्यबाणावर असा प्रश्न आहे. कल्याण लोकसभे मधून आदित्य ठाकरे आणि वरून सरदेसाई निवडणूक लढवतील असे कधीच कोणी म्हंटले नव्हते.(वैशाली दरेकर - उध्दव सेना - कल्याण उमेदवार)