ठाणे - वेगवेगळ्या तीन अपघातांत गुरूवारी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर, रिक्षाचालक आणि पादचारी जखमी झाले असून या तिन्ही अपघातप्रकरणी एकाच दिवशी गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.रामचंद्रनगर येथील सुनील दळवी (३८) हे गुरुवारी सकाळी नितीन कंपनीच्या ब्रिजखालून दुचाकीवरून जात होते. याचदरम्यान भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला मागून धडक दिली. अपघातात सुनील गंभीररीत्या जखमी झाल्यानंतरही टेम्पोचालक श्रीराम जयस्वालने तेथून पळ काढला. सुनील यांना रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलीस नाईक विकास व्हनमाने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जयस्वाल याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.दुसरा अपघात माजिवडा येथे गुरुवारी दुपारी झाला. यामध्ये वागळे इस्टेट येथे राहणारे तथा रिक्षाचालक भागोजी परब (६२) यांच्या रिक्षाला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, रिक्षा तीन वेळा पलटी झाली. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली असून, रिक्षाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी फरार चालकाविरोधात घनश्याम बागल यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.तिसरा अपघात कासारवडवली येथे सायंकाळी घडला आहे. यामध्ये भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीस्वाराने रस्ता ओलांडत असलेल्या अशोक वडेकर (४५) यांना धडक दिली. यामध्ये वडेकर हे जखमी झाले असून दुचाकीस्वार अपघातानंतर फरार झाला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तीन अपघातांत एक ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 6:35 AM