सदानंद नाईक -
उल्हासनगर: कॅम्प नं-५ कुलदेवी मंदिरासमोरील पाच मजल्याच्या पारस इमारतीमधील पाचव्या मजल्याच्या बेडरूमचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडून राजा उर्फ आकाश पोपटानी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला. समहापालिकेचे उपायुक्त अशोक नाईकवाडे, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून इमारत खाली करण्यात आली.
उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून सहा महिन्यांपूर्वी दोन घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोर पारस नावाची पाच मजली इमारत असून २५ वर्ष जुनी असलेली इमारत महापालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास पाचव्या मजल्याचा प्लॅट नं-५०३ च्या बेडरूमचा स्लॅब चौथ्या मजल्यावर पडला. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडून नागरिकांत पळापळ सुरू झाली. शेजारील नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी स्लॅब खाली दबलेल्या राजा उर्फ आकाश पोपटानी नावाच्या तरुणाला बाहेर काढून उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
राज्य शासनाने अवैध बांधकामे व धोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर एक कमिटी स्थापन केली आहे. दरम्यान महापालिकेने सुरक्षीततेच उपाय म्हणून शहरातील १० वर्ष जुन्या इमारतीचे सर्वेक्षण सुरू केले. मात्र त्यामधून आजपर्यंत काहीएक नागरिकांना दिलासा मिळाला नाही. मात्र इमारतीचे स्लॅब पडण्याचे सत्र सुरू असून हजारो नागरिक बेघर झाले आहे.