ठाणे : गरजूंच्या दोनवेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने रेशनकार्डवर स्वस्त दरात दरमहिना धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात अनेक कार्डधारक या सवलतीचा लाभच घेत नसल्याचे आढळून आले. त्यानुसार रेशनच्या धान्याचा लाभ न घेणाऱ्या शहरी भागातील कार्डधारकांची संख्या एक लाख १० हजार असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाच्या तपासणीत समोर आली. त्यामुळे धान्य न घेणाऱ्या कार्डधारकांचे कार्ड वगळले होते. त्यापैकी दोन हजार ८०० शिधापत्रिकाधारकांनी शिधावाटप कार्यालयात येऊन पुन्हा आपल्या शिधापत्रिका पात्र करून सक्रिय केल्याची माहिती ठाणे परिमंडळ शिधावाटप, उपनियंत्रक अधिकारी नरेश वंजारी यांनी दिली.
ठाणे उपनियंत्रक कार्यालयाअंतर्गत १३ रेशन कार्यालये असून, एकूण कार्डधारकांची संख्या सुमारे सहा लाख ७५ हजार आहे. ई-पॉस मशीनद्वारे गरिबांना या दुकानातून धान्याचे वितरण करण्यात येत आहे. या मशीनमुळे अन्नधान्याच्या वितरणात पारदर्शकता आली असून, धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांना जरब बसविण्यास मदत झाली आहे. नवीन यंत्रणेमुळे दररोज अन्नधान्याची किती उचल झाली, याची माहिती एका क्लिकवर समजू लागली असून, दुकानदाराच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. त्यामुळे शिधावाटप दुकानांवर स्वस्तात धान्याचे वाटप करण्यात येत असून, याचा मोठ्या संख्येने गोरगरीब लाभ घेत आहेत. असे असताना, दुसरीकडे अनेक शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे त्यांचा धान्याचा कोटा पडून राहतो. मागील पाच महिन्यांपासून एकदाही धान्य न घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांची यादी तयार केली जाते. शिवाय त्या-त्या रेशन दुकानातही यादी प्रसिद्ध केली जाते. दुकानदारही अन्य कार्डधारकांकडे याबाबत चौकशी करतो. यादीनुसार एक महिन्यासाठी ही कार्ड निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येते. तरीही कार्डधारकांनी प्रतिसाद न दिल्यास ते रद्द केले जात असल्याची माहिती शिधावाटप कार्यालयाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात शिधावाटप विभागाकडे एकूण कार्डधारकांपैकी एक लाख १० हजार कार्डधारकांनी मागील पाच महिन्यांत धान्याची उचलच न केल्याने त्यांचे कार्ड रद्द केले. त्यापैकी दोन हजार ८०० शिधापत्रिकाधारकांनी पुन्हा शिधावाटप विभागाशी संपर्क करून आमचे कार्ड बंद असल्याचे सांगून ते पुन्हा पात्र करून सक्रिय केल्याची माहिती ठाणे परिमंडळ शिधावाटप, उपनियंत्रक अधिकारी नरेश वंजारी यांनी दिली.