लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पंतप्रधान मातृ वंदना योजनेद्वारे पहिले अपत्य असलेल्या मातांना तीन टप्प्यांत तब्बल पाच हजार रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत ४४ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये शासनामार्फत डीबीटीद्वारे महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण विभागाच्या समन्वयातून हा सप्ताह जिल्ह्यातील गावपाड्यांत साजरा होत आहे. या योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्याला २०२१-२२ या वर्षासाठी एकूण एक लाख ३८ हजार ४१५ उद्दिष्ट दिलेले आहे. यापैकी आतापर्यंत ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. म्हणजेच एक लाख १६ हजार ६०८ आदी मातांची नोंदणी झाली आहे. एवढेच नव्हे तर शासनाकडून आतापर्यंत ४४ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये डीबीटीद्वारे महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
जिल्ह्यात १ जानेवारी २०१७ पासून ही योजना कार्यान्वित झाली. यानुसार २०१७ ते २०२२ पर्यंत एक लाख ३८ हजार ४१५ पहिल्यांदा गरोदर असणाऱ्या महिलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. या माता या पाच हजार रुपयांच्या लाभार्थी आहेत. यासाठी आतापर्यंत एक लाख १६ हजार ६०८ मातांची नोंदणी झालेली आहे. यामुळे जिल्ह्यातील गावपाडे, आदिवासी, दुर्गम भागात एकूण ८४ टक्के कामे झाली आहेत. या पात्र लाभार्थी महिलांचे ४४ कोटी १८ लाख ७९ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
.................