ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ७६० बालकांसाठी उप राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार १ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत या लसीकरण मोहिमेला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यासाठी पालकांनी त्यांच्या बालकांना जवळच्या बुथवर घेऊन जाणे आवश्यक असल्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी केले आहे. यासाठी मंगळवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुकाणू समितीची खास बैठक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंगे यांच्या खास उपस्थितीत पार पडली त्यांनी जिल्ह्यातील उपस्थित डाँक्टरांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.अंजली चौधरी, सर्वेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. जळगावकर आणि मुरबाड, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेत कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यास अनुसरुन आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नऊ हजार ४१८ कर्मचार्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी जिल्ह्यात एक हजार ७५ बूथ उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी दोन हजार ६२९ पथकांसह ५२६ पर्यवेक्षक पथक तयार केले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी २१५ बूथ पर्यवेक्षकांचे असणार आहेत. तर १५७ मोबाईल पथकही तैनात राहणार आहेत.