लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी बतावणी करीत कासारवडवली भागातील एका ग्राहकाच्या बँक खात्यातून एक लाख सहा हजार ९९१ रुपये लंपास केल्याची घटना घडली. कासारवडवली पोलीस ठाण्यात मंगळवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
ठाण्यातील कासारवडवली परिसरात राहणारे सतीश मगर यांना काही दिवसांपूर्वी मोबाईलवर एक संदेश आला. त्यात तुमच्या घराचे वीज कनेक्शन कापण्यात येईल. त्यामुळे खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करा, असे बजावले होते. मगर यांनी त्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला असता, तुम्ही भरलेले वीजबिल सर्व्हरवर दिसत नाही. त्यामुळे आम्ही सांगितल्याप्रमाणे ते अपडेट करा, असे त्यांना सांगण्यात आले. त्यांना एक लिंक मोबाईलवर पाठविण्यात आली. तसेच क्वीक सपोर्ट ॲपही डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. मगर यांनी मोबाईलवर आलेली ही एक लिंक ओपन केली. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एक लाख सहा हजार ९९१ इतकी रक्कम काढून घेण्यात आली. कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.