ठाणे : महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सोमवारी कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाची पाहणी केली. या पुलावरील एक लेन मे महिन्यात सुरू होणार असल्याचा दावा त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचीही त्यांनी पाहणी केली.
सोमवारी कळवा येथील रेतीबंदर गणेश विसर्जन घाट, आत्माराम पाटील चौक, रेतीबंदर खारेगाव रोड, साईनाथनगर, सह्याद्री स्कूल, कळवा चौक आदी ठिकाणांचा त्यांनी पाहणी दौरा केला. यात स्वच्छतेला प्राधान्य देऊन रस्ते दुरुस्ती, रंगरंगोटी ही कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी साईनाथनगर येथील मुख्य नाल्याची रुंदी वाढविणे, सह्याद्री स्कूल येथील फुटपाथची आणि मुख्य रस्त्यावरील दुभाजकाची दुरुस्ती व रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये झाडांची लागवड व देखभाल करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कळव्यातील कै. मुकुंद केणी क्रीडा संकुलाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कळवा खाडी नवीन पुलाचीही पाहणी करून मे महिनाअखेर एक लेन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
टीएमटी बसमधून केला दाैरा
शहरातील वाहतूक कोंडी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढते दर लक्षात घेऊन सोमवारचा पाहणी दौरा हा अधिकाऱ्यांनी टीएमटीच्या बसमधून केला. अन्यथा एकाच वेळेस २० ते २५ गाड्या रस्त्यावर येऊन कोंडी झाली असती. हे टाळण्यासाठी आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांसाठी टीएमटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, ते स्वत: त्यांच्या वाहनातून दौऱ्यात सहभागी झाले होते.