लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोपरी पूलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारी मार्गिका शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गिकेवरील जड- अवजड तसेच हलक्या वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. त्याचा परिणाम ठाणे शहर, मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर मार्गावर होणार असून मोठी वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईहून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक कोपरी पूलावरून सुरू राहणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. सध्या या पूलाच्या रुंदीकरणाचे काम मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीएकडून सुरू आहे. यातील दोन नव्या मार्गिका सुरू झालेल्या आहेत. तर मुख्य पूलावरील मार्गिकांचे म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर गर्डर टाकला जाणार आहे. या कामासाठी सध्या सुरू असलेल्या वाहिनीवर क्रेन ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना ही मार्गिका बंद करावी लागणार आहे. हे काम शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ६ पर्यंत सुरू राहील.
या कामाचा परिणाम मुंबई नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड, पूर्व द्रुतगती महामार्गासह शहरातील अंतर्गत रस्त्यावर होणार आहे. त्यातच घोडबंदर मार्गावरही मेट्रो निर्माणासाठी वाहतूक बदल लागू केले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची शक्यता शहरात व्यक्त केली जात आहे.