ठाणे : ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्या भागात रुग्ण आढळला की त्याच्या संपर्कात येणाऱ्यांना महापालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे क्वॉरन्टाइन केले जात आहे. परंतु आता या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरीक क्वॉरन्टाइन करण्यात आले असल्याचा धक्कादायक आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे या ठिकाणी पाण्याचे बाटले भरुन ठेवले गेले आहेत, परंतु त्यामुळे एकामुळे दुसºया लागण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी एक लीटरची पाण्याची बॉटल दोन दोन दिवस करुन पुरवावी लागत आहे. खाण्याचे आबाळ सुरु असून, तपासणी देखील वेळेवर होतांना दिसत नसल्याची गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला आळा घालण्यात आला पालिका प्रशासन आणि सिव्हील रुग्णालय प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र आहे. शहरात आजच्या घडीला २३० वरुन अधिक रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेच्या माध्यमातून घोडबंदर भागातील कासारवडली आणि भार्इंदरपाडा येथे त्यांना क्वॉरन्टाइंन केले जात आहे. त्यामुळे येथील संशयीतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी कोणत्याही स्वरुपाची पुर्तता वेळचे वेळी होतांना दिसत नाही. नागरीकांचे हाल आता सुरु झाले आहेत. एकीकडे उन्हामुळे सारखी तहान लागत असतांना एका नागरीकाला दोन दिवसांसाठी केवळ एकच पाण्याची बॉटल पुरविली जात आहे. त्यामुळे पाण्याविना संशयीतांचे हाल सुरु झाले आहेत. शिवाय काही ठिकाणी पाच पाच लीटरचे बाटले ठेवण्यात आले असून त्यातूनच येथील सर्वांना पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे यातून कोरोना वाढणार की कमी होणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. जेवण वेळेवर मिळत नाही. तेही आम्ही मान्य करु परंतु एखाद्याला जास्तीचा त्रास सुरु झाला तरी देखील त्याची तातडीने तपासणी केली जात नसून संशयींताना देखील उपचारासाठी ताटकळत राहावे लागत असल्याचे माहिती येथील क्वॉरन्टाइन झालेल्या संशयीतांनी व्यक्त केली आहे. तपासणी वेळवर होत नसल्याने आजाराचे निदान वेळेत नाही, त्यामुळे एखादा कोरोनाची लक्षणे दिसणारा नागरीक इतरांच्याही संपर्कात येऊन कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत ही एकप्रकारे भरच पडत आहे.दरम्यान दुसरकीडे क्षमतेपेक्षा जास्तीचे नागरीक येथे ठेवण्यात आल्याचा आरोप राष्टÑवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना सोई सुविधाही वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. या संदर्भात जगदाळे यांनी थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्रव्यवहार केला असून याची दखल घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा कोरोनाच्या रुग्णसंख्येत आणखी वाढ होईल अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी देखील शासनाला व्हिडीओद्वारे विनंती केली असून शक्यतोवर शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार करावेत अशी मागणी केली आहे. खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी गेल्यास त्याचे बील हे दिड ते दोन लाख जात आहे. हे बील भरणेही लॉकडाऊमुळे शक्य होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. कमाईचे साधन नसल्याने एखाद्या रुग्णाने एवढे महागडे बील कसे भरायचे, असा सवाल त्यांनी केला असून आता ही एकप्रकारची लुट असून यातही भष्टÑाचार सुरु झाला की काय अशी शक्यताही निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे शासनाने याची वेळेत दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे ठाण्यात कोरोनावर उपचार घेणाºया रुग्णांबरोबर संशयीतांचेही हाल होतांना दिसत आहेत.
क्वॉरन्टाइन केलेल्यांचे हाल संपेनात दोन दिवसाला एक लीटर बाटली, पाण्याची वाणवा, खाण्याचे आबाळ, क्षमतेपेक्षा जास्तीचा भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 4:09 PM