ठाणे - मागील वर्षभरापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर पुढील एका महिन्यात सुरु झाले नाही तर आहे त्या परिस्थितीत त्याच ठिकाणी दिवाळी पहाट करणार असल्याचा इशारा ठाण्यातील कलाकारांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिला आहे. मंगळवारी या मिनी थिएटरचा पाहणी दौरा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केला होता. यावेळी पाहणी करतांना या नाट्यगृहाची बांधणी चुकीची आणि निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचा आरोपही कलाकारांनी केला आहे. तर महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनीसुध्दा प्रशासनाला यावेळी चांगलेच धारेवर धरले. घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मधील मीनी थिएटर १ आॅक्टोबर २०१७ पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. वर्ष उलटूनही त्याचे काम अर्धवट राहिल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. या वृत्ताची दखल घेऊन मंगळवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यातील कलाकारांबरोबर या ठिकाणचा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या समवेत सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, क्रिडा व सांस्कृतिक सभापती दिपक वेतकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, नगर अभियंता अनिल पाटील, उपायुक्त संदीप माळवी यांच्यासह दिग्दर्शक विजु माने, उदय सबनीस, महेश शानबाग, श्रीरंग खटावकर, आदी कलाकार उपस्थित होते. यावेळी सुरवातीला एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर मिनी थिएटरचा पाहणी दौरा करण्यात आला. या दौऱ्या अंतर्गत मिनी थिएटरचा आवाज मुख्य नाट्यगृहात जात असल्याची प्रमुख बाब निर्दशनास आली. तसेच अनेक ठिकाणी नाट्यगृहाला भेगा पडल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाळवी लागल्याचे दिसून आले. पाण्याची गळती अनेक ठिकाणी होत असल्याची बाबही समोर आली. त्यामुळे हे नाट्यगृहाची बांधणीच चुकीच्या पध्दतीने आणि निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचा गंभीर आरोप यावेळी कलाकारांनी केला. वर्षभरापासून नाट्यगृह का बंद आहे, दुरुस्ती केव्हा सुरु झाली, ती केव्हा पूर्ण होणार असे सवालही यावेळी उपस्थित करण्यात आले.आॅक्टोबर महिन्यात हे मिनी थिएटर बंद झाले असले तरी त्याचे काम एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु एक काम करतांना दुसरे काम, दुसरे करतांना तिसरे अशी कामे वाढत गेल्याने खर्चसुध्दा वाढत गेला. त्यामुळे वाढीव बजेट मिळण्यास विलंब झाल्यानेच हे काम अर्धवट राहिल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु बुधवार पासून पुन्हा हे काम सुरु होऊन एका महिन्याच्या आत हे मिनी थिएटर नाट्यरसिकांसाठी खुले केले जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अहिवर यांनी कलाकारांना दिले. तसेच साऊंड बाबत ज्या काही तक्रारी आहेत, त्या सुध्दा सोडविल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. परंतु एका महिन्याच्या आत मिनी थिएटर सुरु झाले तर दिवाळी पहाटचा कार्यक्रम मोफत करु असे आश्वासन यावेळी कलाकारांनी दिले. परंतु सुरु झाले नाही तर मात्र आम्ही असेल त्या परिस्थितीत या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रम करु असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सुध्दा प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही प्रस्ताव मंजुर करुन देता, परंतु तुमच्याकडून जर वेळेत काम होणार नसेल तर काय उपयोग असा सवाल उपस्थित करीत त्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.दुरुस्तीचे काम एक महिन्यात करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. परंतु ते झाले नाही तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही दिवाळी पहाटचा कार्यक्रम त्याच ठिकाणी करु.(विजू माने - दिग्दर्शक )आमच्यातील उपद्रव्य मुल्य जागे करु नका, नाही तर वेळ पडली तर आम्ही उपोषणाला सुध्दा बसू. त्यामुळे मिनी थिएटर एक महिन्याच्या आत सुरु करा, आम्ही रोजच्या रोज कामाचा अहवाल सुध्दा घेणार आहोत.(उदय सबनीस - कलाकार)
प्रशासनाशी केलेल्या चर्चेनंतर एका महिन्याच्या आत हे नाट्यगृह नाट्यप्रेमींसाठी खुले केले जाणार आहे.(मीनाक्षी शिंदे - महापौर - ठामपा)आता एक महिन्याची मुदत दिली आहे, या महिना भरात काम पूर्ण नाही झाले तर आम्ही प्रशासनाला आमच्या स्टाईलने काम कसे पूर्ण करायचे ते शिकवू.(नरेश म्हस्के - सभागृह नेते - ठामपा)